कटाक्ष : तिसर्या महायुद्धाची शक्यता?

– जयंत माईणकर
जग सध्या तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकते, परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
सध्या जगात तीन ते चार ठिकाणी युद्ध सुरू आहे किंवा युद्धसदृश परिस्थिती आहे. एक प्रकारे दुसर्या महायुद्धानंतर 80 वर्षांनी जग पुन्हा तिसर्या महायुद्धाच्या खाईत लोटले जात आहे की काय, असं वाटतं. त्याचबरोबर तिसर्या महायुद्धात जर अण्वस्त्रांचा वापर केल्या गेला, तर त्याला उत्तरही अण्वस्त्रांनीच मिळेल. अर्थात, मानवजातीला हे युद्ध हानिकारक ठरेल. मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंची हानी होईल ती इतकी मोठी असेल की मानवजातीला पुन्हा पाषाण युगापासून सुरुवात करावी लागेल.
आजच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. अमेरिका, चीन, रशिया आणि युरोपियन युनियन यांसारख्या महासत्तांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. इराण-इस्रायल संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध, उत्तर आणि दक्षिण कोरियातील संघर्ष, गेल्या महिन्यात थांबवलेला भारत-पाक संघर्ष, दक्षिण चीन समुद्रातील तणाव, तैवानच्या मुद्द्यावरील वाद आणि मध्य पूर्वेतील संघर्ष यांसारख्या घटना जागतिक स्थैर्याला आव्हान देत आहेत. त्याचबरोबर क्षेपणास्त्रांची मारा करण्याच्या क्षमतेची स्पर्धा वाढत आहे.
शस्त्रास्त्र बनवणार्या जवळपास सर्वच कंपन्या, कारखाने युरोप आणि अमेरिकेत आहेत. 2023 मध्ये एकूण जागतिक लष्करी खर्च 2.443 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला होता. एवढी मोठी रक्कम विकासकामासाठी वापरली, तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. पण सध्या ही रक्कम माणसाच्या विनाशासाठी वापरली जात आहे.
उदाहरणार्थ, रशिया-युक्रेन युद्धाने नाटो आणि रशिया यांच्यातील तणाव वाढवला आहे. रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली आहे, तर नाटोने युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र पुरवठा केला आहे. यामुळे युद्धाचा विस्तार होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, चीन आणि अमेरिका यांच्यात तैवानच्या मुद्द्यावरून तणाव वाढत आहे.
चीन तैवानला आपला भाग मानतो, तर अमेरिका तैवानला सैन्य आणि आर्थिक पाठबळ देत आहे. या परिस्थितीत एक छोटीशी चिंगारीही मोठ्या संघर्षाला कारणीभूत ठरू शकते. पहलगाममध्ये घडलेल्या अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक संघर्ष उभा राहिला! ऑपरेशन सिंदूर! तिकडे उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर दहा क्षेपणास्त्र डागली.
रशिया-युक्रेन, इराण-इस्रायल संघर्षाचं मूळ कारण खनिज तेल, गॅसच्या साठ्यावर ताबा मिळविणे हाच आहे. युक्रेन युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे युरोप आणि इतर भागांमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या आर्थिक संकटांमुळे देशांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. संसाधनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देश आक्रमक धोरणे अवलंबत आहेत.
उदाहरणार्थ, आफ्रिकेतील खनिज संसाधनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन आणि पाश्चिमात्य देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा केवळ आर्थिक नसून, भू-राजकीय प्रभाव वाढवण्यासाठीही आहे. अशा परिस्थितीत देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मोठ्या संघर्षाची पायाभरणी होऊ शकते.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जागतिक युद्धाची व्याख्याच बदलली आहे.
सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता (Aएआय) आणि ड्रोन तंत्रज्ञान यामुळे युद्धाचे स्वरूप अधिक जटिल आणि धोकादायक बनले आहे. सायबर हल्ल्यांमुळे देशांच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, जसे की वीजपुरवठा, बँकिंग व्यवस्था आणि संरक्षण यंत्रणा, धोक्यात येऊ शकतात. उदाहरणार्थ, 2023 मध्ये अनेक देशांवर सायबर हल्ले झाले, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक आणि संरक्षण यंत्रणांना मोठा धक्का बसला.
याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर लष्करी क्षेत्रात वाढत आहे. स्वायत्त शस्त्रास्त्रे आणि ड्रोन युद्धात क्रांती घडवत आहेत. परंतु, यामुळे युद्धाची तीव्रता आणि नुकसानाची शक्यता वाढली आहे. जर एखाद्या देशाने Aएआय-आधारित शस्त्रांचा गैरवापर केला, तर त्याचे परिणाम अकल्पनीय असू शकतात. यामुळे तिसर्या महायुद्धाची शक्यता अधिकच गंभीर बनते.
हवामान बदल हा सध्या जागतिक पातळीवरील सर्वात मोठा धोका आहे. वाढते तापमान, दुष्काळ, पूर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अनेक देशांमध्ये अस्थिरता वाढत आहे. विशेषतः कमी विकसित देशांमध्ये याचे परिणाम अधिक गंभीर आहेत. पाणी आणि अन्नाच्या कमतरतेमुळे स्थलांतर वाढले आहे, ज्यामुळे देशांमधील तणाव वाढत आहे. उदाहरणार्थ, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील काही भागांमध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू आहेत.
या पर्यावरणीय संकटांमुळे सामाजिक अस्थिरता वाढत आहे. अनेक देशांमध्ये बेरोजगारी, गरिबी आणि सामाजिक असमानता यामुळे सरकारविरोधी आंदोलने होत आहेत. जर ही परिस्थिती नियंत्रणात आणली गेली नाही, तर स्थानिक संघर्ष मोठ्या युद्धात रूपांतरित होऊ शकतात. तिसरे महायुद्ध पारंपरिक युद्धाच्या स्वरूपात असेल की सायबर आणि आर्थिक युद्धाच्या स्वरूपात, हे सांगणे कठीण आहे; परंतु सध्याच्या परिस्थितीत युद्धाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. युद्ध टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
भू-राजकीय तणाव, आर्थिक अस्थिरता, तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि पर्यावरणीय संकटे यामुळे जागतिक शांतता धोक्यात आहे. परंतु, जर सर्वच देशांनी एकत्र येऊन सहकार्याने काम केले, तर युद्ध टाळता येऊ शकते. यासाठी जागतिक नेत्यांनी दूरदृष्टी आणि संयम दाखवणे गरजेचे आहे. शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे हाच एकमेव मार्ग आहे.
आज पंडित नेहरू, कर्नल नासेर, मार्शल टिटो, डॉ. सुकार्णो यांच्या दर्जाचे नेते नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा ‘अमेरिका प्रथम’ यासारखी संकुचित आणि कॅनडाने अमेरिकेत सामील व्हावे अशी विस्तारवादी भूमिका घेणारे आहेत. तर रशियाचे व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करत खुलेआम विस्तारवादी भूमिका घेतली आहे. उत्तर कोरियाचे किम हेही अशाच विस्तारवादी भूमिकेचे आहेत. अशाच वेळी पंडित नेहरूंच्या शांतताप्रिय नेतृत्वाची नितांत गरज भासते.





