Pimpri : महावितरणकडून विजेच्या त्रासावर सकारात्मक पावले

रावेत : रावेत परिसरातील नागरिकांनी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले होते. १४ जून रोजी दै. ‘प्रभात’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने याची गंभीर दखल घेत कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
रावेत सोसायटी फेडरेशनच्या मागणीवर महावितरणने ठोस पावले उचलत ही बाब अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे आणि सहाय्यक अभियंता रत्नदीप काळे (देहूरोड शाखा) यांच्यासमोर मांडली. परिणामी शहरातील ट्रान्सफॉर्मर्सच्या देखभालीसाठी त्वरित हालचाली सुरू करण्यात आल्या. यासोबतच रावेतसाठी स्वतंत्र महावितरण उपकेंद्राच्या मागणीचा पाठपुरावा महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांच्याकडे करण्यात आला. याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले.
महावितरणने नागरिकांच्या तक्रारीची घेतलेली दखल आणि तात्काळ हालचाली पाहता रावेत सोसायटी फेडरेशनने समाधान व्यक्त करत दै. प्रभात आणि महावितरणचे आभार मानले. भविष्यातील उपकेंद्र स्थापनेसाठी मिळालेले आश्वासन हा रावेतकरांसाठी दिलासादायक पाऊल ठरत आहे.





