Positive Story | “माझे वडील मजुरी करतात…मी लंडनमध्ये शिक्षण घेणार”

प्रभात वृत्तसेवा
पुणे – “सर…माझे वडील मजुरी करतात. कधी स्वप्नांतही विचार केला नव्हता, की मी परदेशांत शिक्षणासाठी जाईल. ते शक्य झाले आहे, ते समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे. तेदेखील इतक्या लवकर प्रक्रिया होऊन, यावर विश्वासच बसत नाही,’ ही भावना आहे लंडन येथील एडिनबर्ग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या भंडारा येथील शिवानी वालेकर या विद्यार्थिनीची.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षात निवड झालेल्या 75 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. त्यावेळी या विद्यार्थ्यांनी ही भावना व्यक्त केली.
ही योजना दरवर्षी राबवली जाते. विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी व त्यांना अंतिम मजुरी आदेश देण्याबाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थी आपल्या भावना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे व्यक्त करत होते. प्रतिकूल परिस्थितीत वडिलांना चहा टपरी चालवण्यास मदत करून शिक्षण पूर्ण करणाऱ्या अमरावतीच्या विकास तातड या विद्यार्थ्यांची भावना तर डोळ्यांत पाणी आणणारी होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू असलेले जॉन डुई हे संस्थापक असलेल्या टीचर्स कॉलेजमध्ये जगातील शिक्षण पद्धतीवर संशोधन करण्यासाठी विकास याची निवड झाली आहे.
जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतीही अडचण भासू नये. त्यांना वेळेत परदेशात जाता यावे, त्यांच्या शिक्षणात कुठलीही बाधा येऊ नये, यासाठी विभागाने गतिमान पद्धतीने यावर्षी शिष्यवृत्ती मंजूर केलेले आहे. – डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, (समाज कल्याण विभाग पुणे.)





