Portland Track Festival 2024 Athletics : गुलवीर सिंगने अविनाश साबळेचा 5000 मीटरचा राष्ट्रीय विक्रम काढला मोडीत…

Portland Track Festival 2024 athletics : भारताच्या गुलवीर सिंगने सोमवारी युनायटेड स्टेट्समधील माउंट हूड कम्युनिटी कॉलेजमध्ये झालेल्या पोर्टलँड ट्रॅक फेस्टिव्हल 2024 ऍथलेटिक्स मीटमध्ये पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतील 10,000 मीटर स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या गुलवीर सिंगने पुरुषांच्या एलिट 5000 मीटर शर्यतीत 13:18.92 च्या वेळेसह दुसरे स्थान पटकावले. यूएसएचा डिलन जेकब्स (13:18.18) एलीट रेसमध्ये अव्वल स्थानी राहिला, तर केनियाचा वेस्ली किप्टूने (13:21.77) तिसरा क्रमांक पटकावला.
गुलवीरच्या नावावर भारताच्या पुरुषांच्या 10,000 मीटरचा राष्ट्रीय विक्रमही आहे. 5000 मीटरमध्ये भारताचा पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 13:19.30 होता, जो गेल्या वर्षी लॉस एंजेलिसमध्ये साऊंड रनिंग ऑन ट्रॅक फेस्टमध्ये अविनाश साबळेने नोंदवला होता. आता या विक्रमाची नोंद गुलवीरच्या नावावर झाली आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत भारतीय खेळाडूंनी पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत पॅरिस 2024 ऑलिम्पिक प्रवेशाचे मानक 13:05.00 पार केलेले नाही.
Heilbronner Neckarcup Title 2024 : सुमित नागलने पटकावले विजेतेपद…
गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या साबळेने सोमवारी पोर्टलँड ट्रॅक फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला परंतु तो शर्यत पूर्ण करू शकला नाही. कार्तिक कुमार 13:41.07 वेळेसह 17 व्या स्थानावर राहिला आणि अंतिम रेषा ओलांडणाऱ्या खेळाडूंमध्ये तो शेवटचा होता.
दुसरीकडे, पुरुषांच्या 5000 मीटर निमंत्रित स्पर्धेत अभिषेक पालने अंतिम फेरीत 13:41.57 वेळेसह तिसरे स्थान पटकावले. ग्रेट ब्रिटनच्या टॉम अँडरसन (13:37.89) आणि एली बेनेट (13:41.26) यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय स्थान पटकावले.

