Porsche Case Pune | आईच्या उपचारासाठी विशाल अग्रवालने मागितलेला जामीन अर्ज फेटाळला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कल्याणीनगर पोर्शे अपघातप्रकरणी कोठडीत असलेल्या विशाल अग्रवालचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी फेटाळला. आईच्या शस्त्रक्रियेसाठी तात्पुरता जामीन मिळण्यासाठी हा अर्ज केला होता. शस्त्रक्रियेचे स्वरूप पाहता आरोपीच्या आईची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य उपलब्ध आहेत. त्यामुळे आरोपीला जामीन देण्यास कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले.
न्यायालय म्हणते, पीडितांच्या हक्कांचा आरोपीच्या हक्कांशी समतोल राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपीची तात्पुरत्या जामिनावर सुटका करणे, हे समाजहितासाठी घातक ठरू शकते. गुन्ह्याचे स्वरूप व शिक्षेची तीव्रता, साक्षी-पुराव्यांशी छेडछाड होण्याची वाजवी भीती आणि जनतेचे व्यापक हित लक्षात घेऊन आरोपीची जामिनावर सुटका करण्याचे न्याय कारण दिसत नाही.कल्याणीनगरमधील अपघातानंतर कारचालक मुलगा व त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
या प्रकरणात विशाल अग्रवालसह १० आरोपींवर न्यायालयात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान, विशालने आईच्या शस्त्रक्रियेच्या कारणास्तव २१ दिवसांचा तात्पुरता जामीन देण्याची मागणी केली होती. आई आजारी असून, तिला मणक्यांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे. एकुलता एक मुलगा असल्याने शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर आईची काळजी घेण्यासाठी मानवतेच्या आधारावर तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी विशाल अगरवालच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. त्याला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध केला.




