Porsche car accident case: डाॅ. तावरे, हाळनोरविरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारची मंजुरी

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘पोर्श’ कारचालकासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन कक्षातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि वॉर्डबॉय अतुल घटकांबळे यांच्यावर फौजदारी खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली. ( Porsche car accident case)
या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले मंजुरी पत्र विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी गुरुवारी दाखल केले. त्यामुळे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी असलेले अगरवाल दाम्पत्य आणि ससूनच्या डॉक्टरांसह एकूण सात आरोपींवर आरोप निश्चिती करून सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याणीनगर येथे १८ मेच्या मध्यरात्री अल्पवयीन कारचालकाने ‘पोर्श’ कार भरधाव वेगाने चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर अल्पवयीन चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल या दाम्पत्यासह ‘ससून’च्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्याविरोधात नऊशे पानांचे आरोपपत्र दाखल आहे.





