पोर्शे अपघात प्रकरण : तेव्हा डॉ. अजय तावरे उपस्थित नव्हते

पुणे – कल्याणीनगर येथील पोर्शे अपघातानंतर त्यातील अल्पवयीन मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले, तेव्हा न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे खोटी कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करणे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचे बनावटीकरण करण्याबाबतचे कलम त्यांच्यावर लागू होणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला.
पोर्शे अपघात प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. २७ जून) सुरू झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शुक्रवारी खटल्याची सखोल माहिती न्यायालयासमोर मांडली. आरोप निश्चितीबाबत डॉ. तावरे यांच्या वतीने ॲड. सुधीर शहा यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.
कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. पोर्श कार चालविणारा अल्पवयीन मुलगा आणि त्याच्यासोबतच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससूनमध्ये पाठविले होते. मात्र, नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याच्यासह इतरांच्या मदतीने नमुने बदलल्याचा आरोप आहे. यामध्ये आरोप निश्चितीच्या प्रक्रियेवर युक्तिवाद होत आहे.





