लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार; 8 महिने गरोदर असतानाही केले काम, आता मालिकेतून…

Khushboo Tawde | अभिनेत्री खुशबू तावडेने झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतून एक्झिट घेतली आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असणारी उमा खोत उर्फ उमाईची भूमिका खुशबूने उत्तमरित्या सांभाळली होती. या भूमिकेला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळाला होता. मात्र तिने मालिकेतून निरोप घेण्यामागचे कारण समोर आले आहे. खुशबू लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.
नुकतेच तिने तिचे मालिकेतील शेवटचे काही भाग शूट केले आहेत. खुशबू ही आठ महिन्याची गरोदर असतानाही काम करत होती. अखेर तिने मालिकेचा निरोप घेतला आहे. आता तिची जागा एक दुसरी अभिनेत्री घेणार आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की, ‘मी आई होते आहे आणि हे आईपण निभावण्यासाठी मला मालिकेतून निरोप घ्यावा लागतो आहे. या मालिकेला वर्ष झाले असून, ८ महिने गरोदरपणात मी मालिकेच्या सेटवर काम केले.’ या प्रवासात चाहत्यांकडून प्रेम आणि कौतुक मिळाल्याने तिने सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, खुशबू आणि संग्राम साळवी यांनी २०१८ साली लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर २०२१ मध्ये खुशबूने एका मुलाला जन्म दिला होता. तिच्या मुलाचं नाव राघव असून आता खुशबू तिच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. आता खुशबूच्या जागी उमाईच्या भूमिकेत पल्लवी वैद्य दिसणार असल्याची चर्चा आहे. पल्लवी शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत दिसली होती.
हेही वाचा:
बच्चू कडू यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण





