“पॉपी स्ट्रॉ’चे पाकिस्तान कनेक्शन?

पिंपरी – खसखशीचे पीक घेण्यासाठी महाराष्ट्रात बंदी आहे. खसखशीच्या पिकाला बोंड आल्यानंतर त्याला चिरा पाडून त्यातून चिकट द्रव्य बाहेर पडते त्यापासून अफू तयार केली जाते. अफू हा अंमली पदार्थ असल्याने विविध देशात त्याबद्दल वेगवेगळे कायदे आहेत. काही ठिकाणी खसखशीसाठी तसेच औषधासाठी हे पीक घेतले जाते. पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, म्यानमार आदी देशांमध्ये हे पीक घेतले जाते. तिथून अफूचा काळा बाजार केला जात असल्याचे काही तपास यंत्रणांचे मत आहे. राजस्थानला पाकिस्तानची सीमा आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये पाकिस्तानातून हे अफू तस्करीद्वारे येत असल्याचा अंदाज पोलीस यंत्रणा लावत आहेत.
राजस्थान येथील सप्लायर्स विविध शहरांमध्ये नोकरी, मजुरी, व्यवसायाच्या निमित्ताने जाणा-या लोकांना हस्तक बनवतात. महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये असलेले लोक राजस्थान येथे गावी गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून हा पॉपी स्ट्रॉ राजस्थान ते महाराष्ट्र असा प्रवास करतो. प्रवासात चेकिंग पॉईंटला होणा-या तपासणीत हा पॉपी स्ट्रॉ सहजासहजी ओळखता येत नाही. राजस्थान येथून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रकमधून देखील हा पॉपी स्ट्रॉ मागविला जातो. डिटेक्शन किटशिवाय हा अफू ओळखणे कठीण आहे. मात्र अंमली पदार्थ विरोधी पथकात काम करणारे अनुभवी पोलीस या अंमली पदार्थाची सहज ओळख पटवितात. त्यानंतर पुढील कारवाई केली जाते. मात्र नियमित चेकिंग पॉईंटला कसून चौकशी केली जात नसल्याने हा पॉपी स्ट्रॉ सहज महाराष्ट्रात येतो.
युनायटेड नेशनने सन 1984 मध्ये अंमली पदार्थांच्या उत्पादनावर बंदी घालण्याचा ठराव केला. त्यानंतर तीन वर्षांनी त्याचे आंतरराष्ट्रीय कायद्यात रूपांतर झाले. भारताने सन 1986 सालीच याबाबत कायदा केला. शासनाची परवानगी घेऊन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये खसखशीचे पीक घेता येते. याचा औषध आणि खसखस उत्पादनासाठी वापर केला जातो. मात्र राजस्थानला पाकिस्तानची सीमा आहे. राजस्थानमध्ये पाकिस्तानातून हे अफू तस्करीद्वारे येत असल्याचा अंदाज पोलीस यंत्रणा लावत आहेत.
राजस्थानमध्ये खसखस पिकविण्यास परवानगी असली तरी त्यासाठी शासनाची परवानगीची मोठी प्रक्रिया आहे. ती सर्रास सर्व शेतक-यांना मिळत नाही. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्या या पिकाची तस्करी करण्याचा गोरखधंदा करतात. गांजा, चरस, मेफेड्रोन अशा प्रतिबंधित अंमली पदार्थांच्या बाबतीत जे तस्करीचे रॅकेट आहे, त्याच पद्धतीने अफू तस्करांचे देखील रॅकेट सुरू असल्याचे दिसते. तेच लोण आता महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये देखील पसरत आहे. पाकिस्तानसारख्या देशात अशा तस्करीचे धागेदोरे असल्याची शक्यता आहे.
पॉपी स्ट्रॉचे अर्थशास्त्र
राजस्थान मधील जयपूर येथे शासनाच्या परवानगीने खसखशीची शेती केली जाते. तस्कर ही बोंडे (पॉपी स्ट्रॉ) चोरतात. तसेच बाहेर येणारा पॉपी स्ट्रॉ 15 हजार रुपये किलो प्रमाणे विकला जातो. पॉपी स्ट्रॉ पाण्यात विरघळून त्याचा अर्क काढून तो नशेसाठी वापरला जातो. एखाद्या व्यक्तीसोबत साधारणपणे चार ते पाच किलो पॉपी स्ट्रॉ सहजपणे आणता येऊ शकतो. त्यामुळे एक व्यक्ती सुमारे 70 ते 75 हजारांचा पॉपी स्ट्रॉची वाहतूक करतो. जर हा ट्रकमधून आणला गेला तर तो मोठ्या
प्रमाणात आणता येतो
शहरात मोठ्या प्रमाणात येतोय पॉपी स्ट्रॉ
मागील 15 दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात अफूच्या बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) मोठ्या प्रमाणात आढळला आहे. यातून अफू तयार केली जाते. अफू हा अंमली पदार्थ राज्यात प्रतिबंधित असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नुकत्याच केलेल्या दोन कारवायांमध्ये पॉपी स्ट्रॉ आणि अफू असा 19 लाखांहून अधिकचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये बिष्णोई टोळीच्या पाच सदस्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी हा पॉपी स्ट्रॉ राजस्थान येथून आणला असल्याचे प्राथमिक तपासात सांगितले. या सदस्यांनी राजस्थान येथून ज्यांच्याकडून हा अंमली पदार्थ आणला आहे, अशा पाच जणांवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजस्थान येथून पॉपी स्ट्रॉ महाराष्ट्रात पाठविणा-या सप्लायर्सना अटक करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक देखील या प्रकरणांचा तपास करीत आहेत. किंबहुना या दोन्ही कारवाया अंमली पदार्थ विरोधी पथकानेच केल्या आहेत.





