शिरूर-पाबळ रस्त्याची दुरवस्था; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

शिरूर: शिरूर-पाबळ रस्त्याची झालेली दुरवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची वाढती उदासीनता यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निकृष्ट दर्जाची रस्ते दुरुस्ती आणि अशास्त्रीय पद्धतीने बसवलेले स्पीड ब्रेकर यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी जोर धरत आहे.
शिरूर-पाबळ रस्त्यावरील अनेक खड्डे अद्याप तसेच असून, जे बुजवले आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. रस्त्यावर शास्त्रीय निकष न पाळता बसवलेले स्पीड ब्रेकर अपघातांना निमंत्रण देत आहेत. शिक्षक कॉलनी परिसरातील सेंट जोसेफ स्कूलजवळ यापूर्वी अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. तरीही संबंधित अधिकारी पुणे येथे वास्तव्यास असल्याने ते या रस्त्याकडे फिरकत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली कामे उरकली जात आहेत.
शाळा प्रशासन व पालकांनी सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकरची मागणी केली असता, विभागाने शिरूर पोलिसांकडे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्राची मागणी करत वेळकाढूपणा सुरू केला आहे. विशेष म्हणजे, याच अधिकाऱ्यांनी तालुक्यात इतरत्र अनेक ठिकाणी बेकायदेशीर स्पीड ब्रेकर बसवले आहेत. यापूर्वी त्यांच्या चुकीच्या कामांमुळे त्यांना उच्च न्यायालयात माफीही मागावी लागली आहे.
या बेजबाबदार कारभारामुळे संतापलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.





