Talegaon Dhamdhere: गावाच्या मध्यातून राष्ट्रीय महामार्ग; तळेगावकरांचा विरोध, शाळा-मंदिरांना धोका

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे – ग्रामस्थांना आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आणि सुरक्षिततेसाठी पुन्हा एकदा शासनदरबारी संघर्षाचे पाऊल उचलावे लागत आहे. गावाच्या मध्यभागातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी च्या रुंदीकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
गावाच्या ज्या भागातून हा महामार्ग जात आहे, तिथे घनदाट लोकवस्तीसह आठवडे बाजार, शाळा, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका आणि मंदिरे आहेत. या मुख्य रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरू झाल्यास विद्यार्थी, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांचा मुख्य आरोप
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता आराखडा तयार करताना स्थानिक प्रशासन किंवा नागरिकांना विश्वासात घेतले नाही. रस्ता रुंदीकरणाचे काम करताना संबंधित भोगवटादारांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता मनमानी पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे. कंत्राटदाराकडे रस्ता आराखड्याची मागणी केली असता टाळाटाळ केली जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
पर्यायी मार्ग न दिल्यास संघर्ष अटळ
पूर्वी या महामार्गासाठी गावाबाहेरून बायपास मार्ग प्रस्तावित होता, मात्र प्रशासनाने तो बदलून थेट लोकवस्तीतून महामार्ग आखल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गावाच्या मध्यभागातून महामार्ग न नेता पर्यायी मार्ग द्यावा किंवा उड्डाणपुलाची व्यवस्था करावी, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. जर प्रशासनाने या मागणीची दखल न घेता लोकांचे जीवन धोक्यात टाकले, तर हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा तळेगावकरांनी दिला आहे.





