दृष्टीदोष दाखवून पूजा खेडकर बनली आयएएस?

मुंबई : पुण्यात स्वतःच्या खासगी ऑडीवर लाल दिवा लावणारी आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. पूजा खेडकर यांनी अपंग असलेले सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष असल्याचे सर्टिफिकेट दाखवून आयएएस पदरात पाडून घेतल्याची माहिती आहे. यूपीएससीने सहा वेळा दिल्लीच्या एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलावूनही त्या गैरहजर राहिल्या आहेत.
कुठल्यातरी सेंटरमधून त्यांनी एमआरआय अहवाल मिळवला आणि त्या आधारे त्या कलेक्टर झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे पूजा खेडकर यांचे कलेक्टर बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. यूपीएससी आणि सीएटीने विरोध केला असतानाही त्यांना आयएएस पद कसे देण्यात आले? त्यांच्या नियुक्तीमागे कुठल्या राजकीय नेत्याने आपले वजन वापरले? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. तसेच केंद्र आणि राज्य शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.
कोण आहेत डॉ. पुजा खेडकर?
पुजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी असून, जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्याने वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची एका दिवसापूर्वीच वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.





