Ponniyin Selvan trailer: मणिरत्नमच्या PS I चा भव्यदिव्य ट्रेलर रिलीज,ऐश्वर्याचं धमाकेदार पुनरागमन

मुंबई – मणिरत्नमचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पोनियिन सेल्वन’च्या ट्रेलरची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अनेकजण तर या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. आता चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरने लोकांची ही उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ३.२३ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक पात्राची झलक पाहायला मिळते.
ट्रेलरवरून सत्ता, सिंहासन आणि संघर्ष याबाबतची ही कथा असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.चित्रपटाचा ट्रेलर इतका भव्य दिव्य आहे की तुम्ही बाहुबलीला देखील विसरून जाल. मणिरत्नम आपल्या ऐतिहासिक चित्रपटाद्वारे चोलांचा गौववशाली इतिहास सर्वांसमोर आणणार आहे. मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन देखील या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. यासोबतच साऊथचा स्टार विक्रमही आपल्या खास शैलीत युद्ध लढताना दिसणार आहे.
ट्रेलरमध्ये आणखी एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळणार आहे ती म्हणजे यात तुम्हाला कमल हासन, अनिल कपूर, पृथ्वीराज सुकुमारन, राणा दगुबटी आणि जयंत कैकिनी यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये आवाज दिला आहे.
विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर हा भव्यदिव्य चित्रपट दोन भागात रिलीज होणार आहे. सध्या त्याच्या पहिल्या भागाचा ट्रेलर समोर आलाय. या पहिल्या भागाचे बजेट जवळ जवळ ५०० कोटींचे असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे. तर रवि वर्मनने त्याचे चित्रीकरण केले आहे.




