दिवाळीनंतर प्रदूषणाचा कहर.! ‘फटाके फोडणे योग्य नाही…’; शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत संतापली

Diwali | Mira Rajput : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सणानंतर देशभरात प्रदूषणाचा प्रश्न तीव्र झाला आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये फटाके फोडल्याने हवेतील प्रदूषणाने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ने यावेळी सर्व रेकॉर्ड मोडले असून, प्रदूषणामुळे नागरिक चिंतेत आहेत.
या वाढत्या प्रदूषणाबद्दल बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे आणि दिवाळी साध्या, पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
‘फटाके फोडणे योग्य नाही…’ – मीरा राजपूत
मीरा राजपूतने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे… “आपण अजूनही फटाके का फोडत आहोत? हे काही योग्य नाही! ‘फक्त मुलांना एकदा दाखवण्यासाठी’ किंवा ‘त्यांना अनुभव द्यावा म्हणून’ असं काही करण चालत नाही. इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी फुलबाज्या पेटवणंही चुकीचं आहे, हे लगेच थांबवा.”
तिने पुढे लिहिले…
“फटाके फोडू नका.! मुलांना अर्थ डे शिकवण्याचा काही उपयोग नाही, जेव्हा आपणच प्रदूषण वाढवत आहोत. AQI च्या बातम्या फक्त इंस्टाग्राम स्टोरीसाठी नाहीत, ही तीच हवा आहे ज्यात आपली मुलं श्वास घेतात. शिक्षण आणि जागरूकता असूनही लोकांमध्ये समज नाही. तुम्ही फटाके फोडण्यात व्यस्त असताना, मी माझ्या मुलांना ते पाहायला पाठवणार नाही. कृपया हे थांबवा.” असं तिने लिहलं आहे.
मुंबई आणि दिल्लीमध्ये हवा ‘अत्यंत धोकादायक’ श्रेणीत :
अहवालानुसार, मुंबईच्या बांद्रा परिसरात AQI 300 पर्यंत पोहोचला आहे, जो ‘धोकादायक’ श्रेणीत मोडतो. तर दिल्लीमध्ये AQI 345 नोंदवला गेला असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा (CPCB) नुसार ही स्थिती ‘अत्यंत खराब’ श्रेणीत आहे. फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे सकाळपासूनच अनेक भागांत दाट धुके पसरले आहे.
अभिनेत्री नव्हे तर पर्यावरण-जागरूक उद्योजिका :
मीरा राजपूत ही मुंबईतील ‘धुन वेलनेस’ (Dhun Wellness) या वेलनेस रिट्रीटची संस्थापक आहे. तसेच ती ‘टीना ब्युटी’ आणि ‘एकाउंड ब्युटी’ या ब्रँड्सची सह-संस्थापक देखील आहे. तिने २०१५ मध्ये अभिनेता शाहिद कपूरशी लग्न केले. या दांपत्याला २०१६ मध्ये कन्या आणि २०१८ मध्ये पुत्र झाला.
नागरिकांना आवाहन :
मीरा राजपूतच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटी आणि नागरिकांनी तिच्या मताला पाठिंबा दर्शवला आहे. पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, “दिवाळीचा आनंद नक्की साजरा करा, पण निसर्गाचं नुकसान करून नव्हे.”





