Vinesh Phogat : काँग्रेस आमदार विनेश फोगाट यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘या’ भाजप नेत्यावर केला गंभीर आरोप
काँग्रेसच्या हरियाणातील आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी पहिल्यांदाच बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये आपणही एक असल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर केले आहे.

Vinesh Phogat : महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात तीन वर्षांनंतर सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. काँग्रेसच्या हरियाणातील आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी पहिल्यांदाच बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये आपणही एक असल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर केले आहे. या खुलाश्याने राजकीय आणि क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी रविवारी एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी सांगितले की, “आतापर्यंत मी माझी ओळख उघड करू इच्छित नव्हते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि सुनावणी सुरू आहे.”
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवली जाते. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे मला हे पाऊल उचलावे लागले, असे फोगाट (Vinesh Phogat) यांनी नमूद केले.
🇮🇳🙏 pic.twitter.com/hQrGmMLMrS
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) May 3, 2026
विनेश फोगाट यांचे गंभीर आरोप
फोगाट यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर थेट आरोप करताना सांगितले की, आशियाई स्पर्धेपूर्वीच्या ट्रायल्स जाणीवपूर्वक बृजभूषण यांचा गड असलेल्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या ट्रायल्स एका खासगी कॉलेजमध्ये होणार असून, तेथे निष्पक्ष निवड होण्याची शक्यता फारच कमी आहे.
त्या पुढे म्हणाल्या, “बृजभूषण आता कोणत्याही पदावर नसले तरी कुस्ती महासंघाच्या कामकाजावर त्यांचा प्रभाव अद्याप कायम आहे. मॅचमध्ये कोणते रेफरी असतील, कुणाला किती गुण मिळतील, यासह अनेक महत्त्वाच्या बाबींवर त्यांच्या जवळच्या लोकांचा प्रभाव राहतो.” खेळाडू म्हणून पूर्ण क्षमतेने योगदान देणे या परिस्थितीत अत्यंत कठीण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय घडले होते २०२३ मध्ये?
२०२३ मध्ये दिल्लीतील जंतरमंतर येथे विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पूनिया यांसह अनेक महिला आणि पुरुष कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मोठे आंदोलन केले होते. कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ आणि अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. सहा महिला कुस्तीपटूंनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. बृजभूषण सिंह यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे.
विनेश फोगाट यांच्या या खुलाश्यामुळे प्रकरणाला नवी दिशा मिळाली असून, आगामी काळात न्यायालयीन प्रक्रिया आणि कुस्ती क्षेत्रातील सुधारणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.






