Himanta Biswa Sarma : …तोपर्यंत तुम्ही मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही; ‘या’ नेत्याचा राहुल गांधींना इशारा
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत थेट इशारा दिला आहे.

Himanta Biswa Sarma : देशाच्या राजकीय पटलावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एका बाजूला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत थेट इशारा दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी थेट दिल्लीत रस्त्यावर उतरत केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.
राहुल गांधींना थेट लक्ष्य करताना हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) म्हणाले की, जोपर्यंत भारतात सनातनची अथांग शक्ती उभी आहे, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद कोणात नाही. दहा-वीस हजार लोकांना एकत्र करून जर कोणी मोदींना रोखण्याचे मनसुबे रचत असेल, तर त्यांच्या पाठीशी देशातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आणि सनातन भारताची ताकद आहे हे विसरता कामा नये.
सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेसच्या भूतकाळातील धोरणांवर प्रहार करताना आरोप केला की, काँग्रेसच्या काळात चीन सीमेवर जवानांना वाऱ्यावर सोडले गेले होते; मात्र आज मोदींच्या नेतृत्वाखाली एक नवा आणि निर्भय भारत उभा राहिला आहे. मोदी सरकारच्या सलग तीन कार्यकाळांनी देशाचा चेहरामोहरा बदलून टाकला असून जनतेचा त्यांच्यावर अतूट विश्वास आहे.
दुसऱ्या बाजूला, राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरच्या दिशेने निघालेले राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या २४ तासांत पोलिसांनी त्यांना दोनदा ताब्यात घेऊन काही तासांनंतर सोडले. या कारवाईमुळे विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या दडपशाहीविरोधात ठाम भूमिका घेत म्हटले की, पोलीस कारवाईला किंवा खटल्यांना विरोधक अजिबात घाबरणार नाहीत. निवडणूक आयोग करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
खर्गे यांच्या माहितीनुसार, विरोधी पक्षांचे सुमारे ३०० खासदार निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आपली कैफियत मांडू इच्छित होते; परंतु त्यांना भेट नाकारण्यात आली आणि पोलिसांनी आंदोलनाला मज्जाव केला. आता इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष जंतरमंतरवर ठाण मांडून बसतील आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा विरोधकांनी (Himanta Biswa Sarma) दिला आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जनतेच्या हक्कांवर गदा आणू देणार नाही, असा निर्धार विरोधकांनी व्यक्त केल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.






