Pune District : खेड तालुक्यात राजकीय उलथापालथ

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील राजकीय वातावरणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख हे येत्या काही दिवसांत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षामध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे (शिवसेना – उद्धव ठाकरे गट), आमदार दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) आणि आता भूमिका बदलणारे अतुल देशमुख हे तिन्ही नेते केंद्रस्थानी आहेत, ज्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.
एकूणच, अतुल देशमुख यांचा शिंदे सेनेत प्रवेश हा खेड तालुक्याचे राजकीय तापमान आणखी वाढवणारा ठरणार आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या या प्रवेशामुळे तालुक्यात नवे समीकरण आणि नवे गठबंधन दिसून येणार, हे मात्र नक्की.
देशमुखांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला बळ
देशमुख यांच्या समर्थकांसह शिंदे सेनेत प्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मोठे राजकीय बळ मिळेल. या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असून, काही कार्यकर्त्यांचा कल बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यात तीन प्रमुख नेत्यांचे वर्चस्व
सध्या खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे (शिवसेना – उद्धव ठाकरे गट), आमदार दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) आणि माजी जिप सदस्य अतुल देशमुख हे तिन्ही नेते केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या बरोबरीने शरद बुट्टे पाटील (भाजपा) राजकीय शह देत आहेत.
निवडणूकपूर्व घडामोडींना वेग
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. मात्र, कोणत्या पक्षाचे तिकीट मिळेल याबाबत संभ्रम दिसून येत आहे.
युती की बिघाडीचा धोका?
तालुक्यात सध्या दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस अशा अनेक पक्षांची निवडणुकीसाठी हालचाली सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये युती आघाडी होणार की, स्वबळावर लढाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशमुखांच्या प्रवेशाची उत्सुकता शिगेला
अतुल देशमुख यांचा शिंदे सेनेतील प्रवेश अधिकृतरीत्या जाहीर होण्याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षामध्ये फूट पडणार तर शिवसेना (शिंदे गट) पक्षामधील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत
अतुल देशमुख हे स्थानिक पातळीवर मजबूत संघटन असलेले नेते आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला ग्रामीण भागात नवे बळ मिळेल. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षासाठी ही मोठी पोकळी ठरणार आहे. आगामी निवडणुकीत या हालचालींचा परिणाम थेट मतविभाजनावर दिसेल.
आमचे निर्णय जनतेच्या हितासाठी आणि विकासाभिमुख राजकारणासाठी असतात. पुढील काही दिवसांत अधिकृत घोषणा केली जाईल. – अतुल देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य





