Satara | पवार यांच्या दौऱ्यात विधानसभेची राजकीय पेरणी

सातारा, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या दि. 22 रोजी कर्मवीर जयंती आणि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यामध्ये शरद पवारा यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणुकांची राजकीय पेरणी आणि महत्वपूर्ण मसलती होणार असल्याने या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
काही उमेदवारांची चाचपणीही त्यांच्याकडून केली जाणार आहे. शरद पवार यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व असून येत्या पंधरा दिवसात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
कर्मवीर जयंतीनिमित्त दि. 22 रोजी सकाळी शरद पवार साताऱ्यात येत आहेत. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या कार्यक्रमानिमित्त ते उपस्थित राहणार आहेत. पवारांचा हा दौरा म्हणजे लिटमस टेस्ट राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झाल्यानंतर पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करत आपल्या राष्ट्रवादी पक्षाची बांधणी सुरू ठेवली आहे. विधानसभेला नवीन चेहरे देण्याचा मानस शरद पवार बाळगून आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार मदन भोसले यांची घेतलेली भेट तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी विधानसभा निवडणुकांसाठी ठोकलेल्या शड्डू या साऱ्याच टप्याटप्प्याने घडलेल्या घटना म्हणजे पवार साताऱ्यासाठी सक्रिय झाल्याचे संकेत आहेत. जिल्हयातील नाराजांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चुचकारणार हे उघड आहे.
भाजपची पावलेही विचारपूर्वक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीला सातारा जिल्ह्यासाठी इच्छुक 30 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांच्या निमित्ताने सातारा शासकीय विश्रामगृह आणि कराडमधील नेत्यांची शरद पवार विशेष चर्चा करणार आहेत.
पवार यांचे आगमन बारामतीहून सकाळी हेलिकॉप्टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. वाई, सातारा, कराड उत्तर व कोरेगाव या चार तालुक्यांच्या घडामोडींवर शरद पवार यांचे विशेष लक्ष आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी पवार यांची राजकीय खलबते होणार आहेत.
पवार यांच्यासारखा कसबी नेता कोणत्या वेळी कोणता राजकीय डाव टाकतील याचा नेम नाही यामुळे भारतीय जनता पक्षाचा थिंक टॅंकसुद्धा विचारपूर्वक पावले टाकत आहे.
जिल्ह्यातील आगामी पंधरा दिवसाचे राजकारण पुढील काळात वेगळ्या टप्प्यावर दिसण्याची शक्यता आहे.





