पुणे | भाजपकडून इच्छुकांचे राजकीय “पुनर्वसन’

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीकडून अखेर राज्यातील २७ महामंडळांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात भाजपने पुण्यात समतोल साधत इच्छुकांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. तसेच, पक्षातील अंतर्गत वादही मिटविण्यात आल्याची चर्चा आहे.
यासंबंधीची यादी बुधवारी “व्हायरल’ झाली असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरीही आहे. मात्र, यादीबाबत कोणत्याही राजकीय पदाधिकारी अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बोलण्यास नकार दिला जात आहे.
तर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मात्र ही यादी योग्य असल्याचे सांगत पक्षाने दिलेली जबाबदारी आपण आनंदाने स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले.
या व्हायरल झालेल्या यादीनुसार, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, श्रीनाथ भिमाले यांना राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ, तर राजेश पांडे यांना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात पक्षाने समतोल साधला आहे.
पांडे यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये चर्चेत होते. मात्र, त्यातून नाव वगळण्यात आल्याने त्यांची नाराजी दूर करत त्यांची वखार महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे. महायुतीचे सरकार आल्यापासून राज्यापल नियुक्त आमदार तसेच महामंडळावरील नियुक्त्या प्रलंबित होत्या. मात्र, आचारसंहितेच्या काही तास आधीच या आमदारांचा शपथविधी झाला. त्यानंतर लगेचच ही यादी समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
माधुरी मिसाळ यांचा मार्ग मोकळा ?
पर्वती मतदारसंघात २००९ पासून माधुरी मिसाळ आमदार आहेत. या वेळी येथून उमेदवारी मिळावी, यासाठी मागील सहा महिन्यांपासून श्रीनाथ भिमाले यांच्याकडून जोरदार तयारी आणि प्रचार सुरू करण्यात आला.
त्यामुळे मिसाळांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, या व्हायरल झालेल्या यादीत भिमाले यांना महामंडळ दिल्याचे नमूद असल्याने मिसाळ यांच्या तिकिटाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
सुनील कांबळे यांना पुन्हा संधी?
२०१९ च्या निवडणुकीत तत्कालीन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे तिकीट कापून भाजपने सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसला या मतदारसंघातून १५ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.
त्यामुळे भाजपकडून या वेळी आमदार सुनील कांबळे यांच्या जागेवर पुन्हा दिलीप कांबळे यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, पक्षाने दिलीप कांबळे यांना महामंडळाचे अध्यक्षपद दिल्याचे यादीत सांगण्यात आल्याने येथून सुनील कांबळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.



