लक्षवेधी : गर्दी खेचण्याची चढाओढ

सर्वच राजकीय पक्षांत विशिष्ट आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून गर्दी खेचण्याची चढाओढ आहे. अशा गुरूजनांना केवळ राजकीय फायद्यासाठीच आणले जाते.
भारतात विविधता आहे. या विविधतेत एकता साधून देशाचा किंवा एखाद्या राज्याचा गाडा हाकणे कधीही उत्तम असते. तशी एकता साधता येत नसेल तर मग विविधतेत गटवारी केली जाते. त्यात आपल्या सोयीनुसार एक मोठा गट निवडला जातो. त्या गटातही पुन्हा उपगट असतील तर त्या उपगटांना मुख्य गटातच एकसंध ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. राजकीय नेतृत्वाला एकट्याला हे करणे शक्य नसते. अशा वेळी समाजात ज्यांच्याबद्दल आदर आहे, ज्यांना मान्यता आहे, ज्यांच्याबद्दल श्रद्धा आहे त्यांची मदत घेतली जाते.
लोकसभा निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. काही महत्त्वाच्या राज्यांत निवडणुकांचा शंखनाद झाला आहे. आध्यात्मिक गुरू सातत्याने विविध वाहिन्यांवर आणि पोस्टर्सवर झळकत आहेत. रोज कुठल्या न कुठल्या जिल्ह्यात त्यांचे भव्य कार्यक्रम होत आहेत. त्यांना प्रतिसाद मिळतो हे सांगायची गरजच नाही. त्यांच्या नावावरच गर्दी होत असल्यामुळे हे कार्यक्रम ठेवले जातात.
ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर जी फाळणी झाली ती धर्माच्या आधारावर होती. त्यानंतर भारताने “धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ अशी आपली ओळख दृढ केली. देशात प्रत्येक भागानुसार विविधता आहे. भिन्न जाती-धर्म-समुदाय आहेत. लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहात होते आणि राहतात. जोपर्यंत त्यांच्यात कथित हुंकार भरला जात नाही तोपर्यंत सगळे सुखेनैव चालतेही. त्यानंतर कोणी त्यात हस्तक्षेप करत कोणाला त्याच्या वेगळेपणाची जाणीव करून दिली की गडबड होण्यास सुरुवात होते. ही गडबड विशेषत: काही निश्चित लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून केली जाते. अन्यथा लोकांना आपले आयुष्य शांतपणे व्यथित करणे आणि मिळालाच वेळ तर तो चांगल्या कारणासाठी लावण्याची इच्छा असते.
राजकारणात पूर्वी एकाच राजकीय पक्षावर उजवेपणाचा शिक्का होता. त्याचे कारण धर्माची प्रखर भूमिका मांडणारे, प्रसंगी कट्टर भूमिका मांडणारे बहुतांश लोक या पक्षाशी निगडीत होते. एका आंदोलनाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्यावर या पक्षाची जनमानसातील पकड अधिक घट्ट होत गेली. जे धार्मिक नेते राजकारणविरहित पद्धतीने संबंधित पक्षाशी जोडले गेले होते, त्यांचे बरेच नाव झाले व त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांचे अनुयायी अगोदरच भरपूर होते. मात्र, पक्षाच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्या अनुयायांना सीमांचे बंधन राहिले नाही.
एका विशिष्ट प्रदेशाबाहेरही त्यांची ख्याती झाली आणि त्यांना देशभर मान्यता मिळाली. त्यांचा हा फायदा झाला, ते नॅशनल फिगर झालेच आणि ज्या पक्षाशी त्यांची कथित जवळीक होती त्या पक्षालाही सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. त्यांच्यातील नंतर सक्रिय राजकारणातही आलेत. त्यांनी आपल्या अनुयायांना समर्थक करून आपला उद्धारही करून घेतला. साधारण अडीच ते तीन दशकांपूर्वी सुरू झालेली ही प्रक्रिया आजही कायम आहे.
सुरुवातीला या संबंधित पक्षाला उजवे आणि संकुचित म्हणून हिणवणारे नंतर कधी त्यांचेच अनुकरण करू लागले हे आता त्यांनाही कळेनासे झाले आहे. अनुकरणाची ही सुरुवातही आता गेल्या 12-14 वर्षांपूर्वीच झाली आहे. त्यापूर्वी त्यांचा धर्म आणि श्रद्धा नव्हती असे नाही. तथापि, ते सगळे खासगीत होते. सार्वजनिक जीवनात त्यांनी ते कटाक्षाने टाळले. या नव्या लोकांनी अगोदरच्या मंडळींच्या मार्गाने चालण्यास सुरुवात केल्यावर नाही म्हटले तरी अगोदरचे अस्वस्थ झालेत. असे झाले की मग आपली मुळे आणखी घट्ट केली जातात आणि नवा किंवा नवे स्पर्धकही आणखी वेगाने मूळच्या पक्षाचे अनुकरण करू लागतात. हा सगळा प्रकार गेल्या दशकभरापासून पाहायला मिळतो आहे.
निवडणुकांच्या तोंडावर विशिष्ट आध्यात्मिक गुरूंना केवळ गर्दी खेचण्यासाठी सक्रिय केले जाते. त्यांची आणि त्यांच्या लवाजम्याची राहण्याची सोय, वाहतुकीची सोय, पाकीट (मानधन) हे सगळे सोपस्कार पूर्ण होतात. जे भक्त (मतदार) त्यांचे विचार ऐकण्यासाठी येतात त्यांच्याही खाण्याची (भंडारा/प्रसाद) सोय आयोजकांकडून केली जाते. मध्य प्रदेशातून आता समोर आलेल्या माहितीनुसार अशा कार्यक्रमाला साधारण 1 ते 2 कोटी रुपयांच्या घरात खर्च होतो.
निवडणूक होणार असल्यामुळे साहजिकच या कार्यक्रमांचे आयोजक राजकीय नेतेच आहेत. काही ठिकाणी इच्छुकांकडूनही त्याचे आयोजन केले जाते. ज्या पक्षाची प्रतिमा अगोदरच निर्धारित आहे त्या पक्षाचा प्रश्नच नाही. तथापि, ज्या पक्षांनी सुरुवातीपासून आपली वेगळी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला त्या पक्षांच्या नेत्यांचाही यात समावेश आहे. काही ठिकाणी सप्ताहांचे आयोजन केले जाते आहे आणि राज्यातील
सर्वोच्च पदावर बसलेल्या आजी-माजी व्यक्तींचीही यात गुंतवणूक आहे. राजकारण्यांचे एक गणित असते. त्यांना गर्दी हवी असते. त्या गर्दीला आपल्याला अनुकूल कसे करून घ्यायचे हे त्यांना जमते. पण मुद्दलात अगोदर गर्दी जमवणे महत्त्वाचे असल्यामुळे अध्यात्माच्या क्षेत्रात असणाऱ्या मंडळींना त्यांच्याकडून सन्मानाने पाचारण केले जाते. त्यातून जनसामान्यांमध्ये याच मंडळींच्या मार्फत त्यांच्याही न कळत एक संदेश दिला जातो. आमचा धर्मही तोच आहे, वेगळा नाही हे ठसवले जाते. भलेही काही पक्षांचे दिल्लीतील नेते या धर्माच्या सांगडीपासून अलिप्त राहण्याचा अथवा स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तरी स्थानिक राजकारणाची अपरिहार्यता म्हणून तेही यात नकळत ओढले जातात आणि त्यांच्याही धार्मिक स्थळांच्या वाऱ्या सुरू होतात.
धार्मिक असण्याची किंवा दिसण्याची ही चढाओढच असते. यातला दुर्दैवाचा भाग असा की जो सश्रद्ध असतो तो गुरूंच्या आणि गुरू आयोजकांच्या आणि आयोजक त्यांच्या सत्ताकांक्षेच्या इच्छा आणि हेतूखातर हे करत असतो. अशा निवडणुकांतून होणारी फलप्राप्ती कशी असणार?





