पुणे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
अमोल बनकर
सासवड – पुरंदर तालुक्यातील एकमेव असणारी नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती ही नीरा भागामध्ये गुळाचा व्यापार तर सासवड येथे धान्याचा व्यापार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही बाजार समिती दोन तालुक्यातील मिळून असल्याने याचे कार्यालय नीरा व सासवड या ठिकाणी असूनही बारामती व पुरंदर या दोन्ही तालुक्याची सत्ता केंद्र आहेत. दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने पुरंदर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पुरंदर तालुक्यातील 100 बारामती तालुक्यातील 32 गावांचे कार्यक्षेत्र आहे. गेले अनेक वर्षे अडचणीत असणारी बाजार समिती मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात काही अंशी फायद्यात आली आहे. गूळ, धन्याचा व्यापार व पेट्रोल पंप हा बाजार समितीचा कणा असल्याने कर्मचाऱ्यांना गेल्या पगाराची प्रतीक्षा करावी लागत नाही.वर्षभरापूर्वी देखील निवडणुकीचा बिगुल वाजला होता. प्रारूप मतदार यादी देखील प्रसिद्ध झाली होती. पण, शासनाने ही निवडणूक पुन्हा पुढे ढकलली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रखडलेल्या निवडणुकीसाठी दोन वर्षानंतर पुन्हा दुसऱ्यांदा बिगुल वाजला आहे. 27 सप्टेंबरपासून मतदार यादीचे काम सुरू होईल. 23 ते 29 डिसेंबर अखेर अर्ज दाखल करता येतील. 30 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी 2 जानेवारी छाननी आणि नंतर वैद्य नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी करणे 02 ते 16 जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे. 17 जानेवारी रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप करणे, 29 जानेवारीला मतदान, तर 30 ला मतमोजणी होईल.
नीरा बाजार समितीची ऑगस्ट 2021 मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. करोनामुळे ही निवडणूक रेंगाळली होती. निवडणूक बाजार समितीच्या पारंपरिक पद्धतीनेच होईल. विविध कार्यकारी सेवा संस्था गटातून सर्वाधिक 11 संचालक निवडले जातील. त्या पाठोपाठ ग्रामपंचायत गटातून 4 संचालक आहेत. व्यापारी, अडते गटातून 2, तर हमाल मापाडी गटातून 1 प्रतिनिधी निवडला जाईल. एकूण 18 संचालक निवडले जाणार आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीने निवणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांना सन्मानजनक जागा न मिळाल्याने निवडणूक लागली होती, त्यामुळे यंदा काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असले तरी राजकीय वातावरण ढवळून निघणार एवढे मात्र नक्की!
शिंदे गट, भाजपही उडी घेणार
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे प्राबल्य राहिलेले असून आगामी निवडणुकीत यावर्षी प्रथमच शिवसेना (शिंदे गट) व भाजपकडून देखील उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सेवा सोसायटीसाठी 1970 मतदार
सर्वाधिक विविध कार्यकारी सेवा संस्थांचे 11 सदस्य निवडले जाणार असून यासाठी बारामती तालुक्यातील 820 व पुरंदर तालुक्यातील 1150 मतदार असतील तर अंदाजे. पुरंदर तालुक्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 250 शिवसेनेकडे 175 भाजपकडे 50 तर कॉंग्रेसकडे 700 तर बारामतीतील 820 मतदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सेवा सोसायटी मतदारसंघातमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य असल्याचे देखील चर्चा पुरंदरमध्ये रंगत आहेत.
शेतकरी मतदानाचा अधिकार गुंडाळला
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक परिस्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे तर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सत्तेवर आलेल्या नव्या सरकारने घेतला होता; पण आर्थिकदृष्ट्या न पेलणाऱ्या या निर्णयातून शासनाने पुन्हा घुमजाव केले. यापूर्वी देखील मुख्यमंत्री फडणवीस असताना हाच निर्णय झाला होता. परिणामी, शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दुसऱ्यांदा गुंडाळला गेल्याचे चित्र आहे.





