Nagar | भूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ

पारनेर, (प्रतिनिधी) – तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, या प्रमुख मागण्यांच्या संदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तहसील कार्यालय पारनेर येथे उपोषणाला बसले आहेत.
परंतु गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या उपोषणाकडे तालुक्यातील राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
उपोषणकर्ते भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर म्हणाले की, पारनेर हा दुष्काळी तालुका असून, गेल्या ५० वर्षापासून पारनेर तालुक्यात पाणी प्रश्नावर विविध आंदोलने झाली.
निवडणुकांमध्ये फक्त तालुक्याचा पाणी प्रश्न राजकीय पुढार्यांना आठवतो परंतु पारनेर तहसीलवर गेल्या तीन दिवसांपासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे.
तरीही तालुक्यातील कोणताच राजकीय पुढारी उपोषणाकडे फिरकलाच नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पुढार्यांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.
अजूनपर्यंत प्रशासनाने सुद्धा उपोषणाची दखल घेतली नाही, ही मोठी शोकांतिकाच आहे. पारनेरच्या पाणी प्रश्नावर आम्ही लढा उभारला आहे आणि हा लढा असा सुरू ठेवणार आहे.
भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, अशोक आंधळे, तालुकाध्यक्ष मनोज तामखडे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, बाळशिराम पायमोडे, नंदू साळवे, रघुनाथ मांडगे, रावसाहेब झांबरे, सुदाम झावरे, संजय भोर, कारभारी आहेर, सुभाष ठुबे, वसंत साठे, अमोल रोकडे,
शिवम पवार, शुभम टेकुडे, बाबासाहेब वाडेकर, दत्ता फटांगरे, अंकुश पायमोडे, देवराम कुदळे, सुभाष करंजुले, विशाल पायमोडे, संजय भोर आदी कार्यकर्ते पाणी प्रश्नासंदर्भात पारनेर तहसील कार्यालयावर उपोषणाला बसले आहेत.





