नाशिकमध्ये राजकीय खेळ ! नवरा ठाकरे, तर बायको शिंदे गटात; बाळा दराडेंच्या पत्नीचा धक्कादायक प्रवेश

नाशिक : नाशिकच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena UBT) सातत्याने गळती होत असताना आता आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे.
ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नी किरण दराडे (माजी नगरसेविका) आणि इतर नेत्यांनी आज (17 जून) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशात पुंजाराम गामने आणि सीमा निगळ या माजी नगरसेविकांचाही समावेश आहे, ज्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
नवऱ्याची धमकी, बायकोचा शिंदे गटात प्रवेश
बाळा दराडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासण्याची थेट धमकी दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्धच्या वक्तव्यासाठी त्यांनी हा इशारा दिला होता.
मात्र, त्याच बाळा दराडे यांची पत्नी किरण दराडे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला आहे. किरण यांनी सांगितले, “माझे वडिल हिंदूत्ववादी विचारांचे होते. प्रभागात काम न झाल्याने मी शिंदे गटात प्रवेश करत आहे. माझे पती अजून ठाकरे गटात आहेत, पण त्यांचेही मत बदलेल, असा मला विश्वास आहे.”
ठाकरे गटाची गळती सुरूच
गेल्या काही दिवसांत सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक नेत्यांनी ठाकरे गट सोडला आहे. आता किरण दराडे, पुंजाराम गामने आणि सीमा निगळ यांच्यासारख्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्याने ठाकरे गटाला आणखी धक्का बसला आहे.
किरण यांनी उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसबरोबरचा संबंध आणि हिंदूत्वाला दुय्यम मानण्याचा आरोप करत आपला निर्णय पक्का केला. शिंदे गटाकडून या प्रवेशाला महत्त्व दिले जात असून, नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाला बळकटी मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.





