प्रभात वृत्तसेवा जवळार्जुन – जेजुरीत तब्बल साडेआठ वर्षांनंतर जेजुरी नगरपरिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हवा चांगलीच तापू लागली आहे. जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांचे पुत्र माजी, उपनगराध्यक्ष जयदीप बारभाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ही निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता आहे. मात्र, इतर पक्ष कोणत्या गटाशी हातमिळवणी करतात, याची उत्सुकता लागून राहिली आहे.पुणे येथे राष्ट्रवादी भवन येथे जेजुरी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र, सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी जयदीप बारभाई यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ज्येष्ठ नेते रोहिदास कुंभार व बाळासाहेब सातभाई यांनी त्यास अनुमोदन दिल्यामुळे अखेर अजित पवार यांनी नगराध्यक्षपदासाठी जयदीप बारभाई यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे जेजुरीत जोरदार लढतीचे संकेत मिळत आहेत. जयदीप बारभाई यांच्याविरोधात आता भाजपाकडून उमेदवारी कोणाला मिळणार. याबाबत उत्सुकता वाढली आहे. 18 पगड जाती धर्माच्या बारा बलुतेदार समाज असलेल्या जेजुरी नगरपरिषदेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील सत्ता होती. त्यापूर्वी दिलीप बारभाई यांच्याकडे नगरपरिषदेची सत्ता होती. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याचबरोबर घटक पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे जेजुरीत नगरपरिषद निवडणूक दुरंगी किंवा तिरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून तगड्या उमेदवाराचा शोध.. जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या लढतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने जयदीप बारभाई यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी समर्थक, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. त्यात माजी आमदार संजय जगताप यांच्याकडून नगराध्यक्ष पदाच्या लढतीत तगडा उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे जगताप यांनी शोध सुरू केला आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यामुळे जेजुरी नगरातील हवा तापली आहे.