Indapur : दहीहंडीच्या निमित्ताने राजकीय मतभेदांना ब्रेक
Indapur : दहीहंडीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘मित्र’ म्हणून नेत्यांनी लावलेली उपस्थिती हीच कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चेची बाब ठरली.

इंदापूर : गोविंदांच्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण, ढोल-ताशांचा निनाद आणि मानवी मनोऱ्यांच्या थराराने इंदापूर शहरातील प्रदीप गारटकर मित्र परिवाराचा भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात पार पडला. शनिवारी (दि. ६) प्रशासकीय भवनासमोर मुंबईच्या विलेपार्ले येथील पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या महिला गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत बाजी मारली. विजेत्या संघाला १ लाख २१ हजार रुपये रोख व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुरुष गटात इंदापूरच्या व्यंकटेश दहीहंडी संघाने सात थरांचा आकर्षक मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार रुपये रोख व मानचिन्ह देण्यात आले. सहभागी महात्मा फुले व इंद्रेश्वर दहीहंडी संघांसह अन्य संघांना प्रत्येकी ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.
दहीहंडीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘मित्र’ म्हणून नेत्यांनी लावलेली उपस्थिती हीच कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चेची बाब ठरली.
यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, भाजपचे युवा नेते प्रवीण माने, छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, नीरा-भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष विलास वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सागर मिसाळ,उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, गजानन गवळी, अमर गाडे, पोपट शिंदे, अमर नलवडे, स्वप्नील राऊत, कृष्णा ताटे, राहुल गुंडेकर, भैया कोकाटे उपस्थित होते.
दहीहंडीतून मैत्रीचा संदेश
दहीहंडी हा मर्दानी खेळ असून, त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. यापुढेही असे उपक्रम राबवत राहू. या उत्सवात आपापले पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून केवळ मित्र म्हणून सर्वच नेतेमंडळी उपस्थित राहिली,” असे आयोजक प्रदीप गारटकर यांनी सांगितले.





