sunetra pawar : राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?
sunetra pawar : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला आहे.

sunetra pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे बोलले जात आहे.
अशाताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
फोन करून सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती
बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून काही इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती देखील पार पडल्या आहेत. लवकरच नावांची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे.

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढणार आहेत.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिला जात आहे. पण काँग्रेस पक्ष या संदर्भात काय भूमिका घेतो हेही महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणते नेते राहणार उपस्थित
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक 23 एप्रिलला पार पडणार आहे. 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 4 मे या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. लवकरच सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पण सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघर्ष सुरू आहे.
सुनेत्रा पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षातील कोणते नेते उपस्थित राहणार हे पाहावे लागणार आहे.





