पेठ परिसरात डास निर्मूलनासाठी धुराळणी

पेठ- वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे पेठ परिसरात जंतुसंसर्ग आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने गावात सर्वत्र धुराळणी यंत्राने फवारणी सुरू केली आहे.

पेठ परिसरात पावसाची रिपरिप व उन्हाचा अधून-मधून वाढलेला तडाखा यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. पेठ, मंचर, राजगुरुनगर येथील दवाखान्यात हिवताप, डेंग्यू, मलेरिया, थंडी, उलट्या, जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत. अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या थंडी, ताप, खोकला व इतर आजारांमुळे मंदावली आहे. त्यामुळे या आजारांचे रुग्ण वाढू नये म्हणून प्रशासनाने धुराळणी यंत्राद्वारे फवारणी सुरू केली आहे.

येथील पूर्ण गावठाण, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, माध्यमिक शाळा, माळवस्ती, वेळ नदीकाठ गाव परिसर आदी ठिकाणी धुराळणी करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी आपल्या घराशेजारील परिसर स्वच्छ करावा, ओपन गटारे झाकून ठेवावी, साचलेले सांडपाणी प्रवाहित करावे, असे आवाहन पेठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अशोक मैदाड यांनी केले आहे. सरपंच सुरेखा पडवळ, उपसरपंच अनिता कंधारे, माजी उपसरपंच संतोष धुमाळ, अशोक राक्षे, अनिल सणस, बाळासाहेब रागमहाले यांनी फवारणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.