नाईट ड्युटीवरुन घरी जाताना पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

धुळे : धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शहरातील नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव शिवारात झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कसा झाला अपघात?
धुळ्याच्या साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी गुलाब शिंपी हे आपल्या दुचाकीवरून जात असताना महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या कंटनेरचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्यावर दुचाकी धडकून गुलाब शिंपी यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत गुलाब शिंपी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सन 2014 मध्ये गुलाब शिंपी हे पोलीस खात्यात भरती झाले होते, सध्या ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
दरम्यान, गुलाब शिंपी यांच्या अकाल, अपघाती निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे पोलीस खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुलाब शिंपी यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, 5 वर्षांची मुलगी, 3 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.





