Pune District : कंटेनरला कार धडकल्याने पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

महाळुंगे इंगळे : नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी ठिकठिकाणी लावलेली नाकाबंदी तपासण्यासाठी जात असताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथे घडली. समोरून जाणार्या कंटेनरने अचानक लेन बदलल्याने हा अपघात झाला. कंटेनरला पाठीमागून कार धडकली. यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे. जितेंद्र सुरेश गिरनार असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मागील एक वर्षापासून नेमणुकीस होते. वर्षाखेरीस पोलिसांनी हद्दीमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. तिथे वाहनांची तपासणी तसेच नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर कारवाई केली जात होती.
गिरनार हे नाकाबंदी, बंदोबस्त तपासणीचे काम करत होते. महिंद्रा कंपनीसमोर एका कंटेनरने अचानक लेन बदलली. त्यामुळे गिरनार यांची कार कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गिरनार यांचा मृत्यू झाला. गिरनार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील आहेत.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांची एक लहान मुलगी आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह धुळे येथे त्यांच्या गावी पाठविण्यात आला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर पोलीस दलातील अधिकार्याचा मृत्यू झाल्याने नवीन वर्षाच्या आनंदावर विरजण पडले आहे.





