सिंधुदुर्ग – करोनामुळे राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला असून कठोर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारने प्रवासावरही निर्बंध घातले असून ई-पासची अट घालण्यात आली आहे. ई-पास नसणाऱ्यांना पोलीस प्रवासाची परवानगी देत नसून कारवाईदेखील केली जात आहे. दरम्यान भारतीय संघाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ गोव्याला जात असताना त्यालाही पोलिसांनी अडवले. पोलिसांनी चौकशी केली असता ई-पासविनाच प्रवास करत असल्याचे समोर आले. ( Cricketer Prithvi Shaw stopped by Sindhudurg police )
पृथ्वी शॉ कारने आपल्या मित्रांसोबत मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याला चालला होता. यावेळी आंबोली पोलिसांनी त्याला रोखले आणि ई-पासची विचारणा केली. ई-पास नसल्याने पृथ्वी शॉने आपल्याला जाण्याची परवानगी द्यावी यासाठी विनंती केली. मात्र पोलिसांनी ई-पासशिवाय पुढील प्रवास करता येणार नाही, असे स्पष्ट केले.
यानंतर पृथ्वी शॉने आपल्या मोबाइलवरुन ई-पाससाठी अर्ज केला. एका तासात पृथ्वी शॉला ई-पास मिळाला आणि त्यानंतरच त्याला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली संघातून खेळत होता. करोना संकटामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
स्पर्धा स्थगित झाल्यामुळे अनेक क्रिकेटर्स सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असताना पृथ्वी शॉने मित्रांसोबत गोव्याला जाणे पसंत केले. मात्र यावेळी नियमांचे पालन न करणे त्याला चांगले महागात पडले.
अत्यावश्यक प्रवासासाठी ‘असा’ बनवा ई-पास! Https://Covid19.Mhpolice.In/
गोव्याला चाललायेत का? तर हि बातमी नक्की वाचा