आग्रा – उत्तर प्रदेशातील आग्रा येथून माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथ आपल्या करोनाबाधित आईसाठी अनेक प्रयत्न करून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका १७ वर्षीय युवकाकडून पोलिसांनी सिलेंडर हिसकावलं. युवकाने हात जोडून पोलिसांना सिलेंडर परत करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी सिलेंडर दिले नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी सिलेंडर हिसकावल्यानंतर युवक पोलिसांसमोर हात जोडत होता. माझी आई ऑक्सिजनअभावी मरू शकतो. सिलेंडर घेऊन जाऊ नका. मी कुठून ऑक्सिजन सिलेंडर आणू अस म्हणत होता. या घटनेच्या व्हिडीओमुळे उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. उच्चपदस्थ अधिकऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आग्रा येथील उपाध्याय रुग्णालयातील आहे. या व्हिडीओतील युवकाचं नाव अंश गोयल आहे. त्याने सांगितलं की, अनेक प्रयत्नानंतर त्याला आईसाठी ऑक्सिजन सिलेंडर मिळाला होता. मात्र पोलिसांनी VIP व्यक्तीसाठी त्याच्याकडील सिलेंडर हिसकावला. त्यानंतर युवकाच्या आईचा दोन तासांनी मृत्यू झाला.