आरोग्य निरीक्षकांच्या संरक्षणासाठी धावले पोलीस

सातारा – सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाई मोहिमेत आरोग्य निरीक्षकांच्या अंगावर जाणाऱ्या बहाद्दरांचा पोलिसांनी मंगळवारी चांगलाच समाचार घेतला. सरकारी कामकाजात अडथळा आणणाऱ्यांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळी जाऊन ताब्यात घेतले. पोलीस मदतीला धावले. मात्र, बांधकाम अभियंता भाऊसाहेब पाटील बजेट मिटींगचे कारण देऊन पालिकेत खुर्ची उबवत बसले.
पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेत पहिल्या दिवशी रस्त्यावर उतरण्याचा स्टंट करुन झाल्यावर पालिका मुख्याधिकारी व मुख्य बांधकाम अभियंता मोहिमेतून गायब झाले आहेत. मोहिमेच्या धडाक्याने दुखावलेल्या काही मंडळींनी अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांना रडारवर घेतले आहे. आरटीओ चौकात मंगळवारी अतिक्रमणं हटवण्यासाठी गेल्यानंतर चहा विक्रेत्यासह अन्य एकाने अष्टेकर व निकम यांच्याशी हुज्जत घालत अतिक्रमण मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. निकम यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्यांची हमरातुमरी सुरूच होती.
हुज्जत घालणाऱ्यांची गर्दी वाढत गेल्याने बाका प्रसंग ओढवला. दरम्यान निकम यांनी मुख्याधिकारी गोरे, अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस कर्मचारी राहुल खाडे यांनी शहर पोलीस ठाण्याला कल्पना दिल्यावर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळी येऊन पोपटपंची करणाऱ्यांना हिसका दाखवला.
खाकीचा रुद्रावतार पाहून मी मी म्हणणारे तेथून गायब झाले. पाठोपाठ पीसीआरचा ताफा तेथे दाखल झाल्याने अतिक्रमण मोहिमेला हत्तीचे बळ आले. आरटीओ चौकातील शेवटची चहाची टपरी हटवून सर्व रस्ता मोकळा करण्यात आला. पुन्हा कोणी येथे अतिक्रमण करू नये, म्हणून जेसीबीने पन्नास फूट लांबीचा मोठा चर खणण्यात आला.
अतिक्रमण मोहीम ही फार्स नाही हाच संदेश या मोहिमच्या निमित्ताने गेला आहे. मात्र, अडचणीच्या प्रसंगात कर्मचारी दाढेला देऊन आपण मात्र नामानिराळे राहायचे ही वृत्ती पालिकेच्या प्रशासन प्रमुखांना अजिबात शोभत नाही. कर्मचाऱ्यांची जबाबदारी ही मुख्याधिकाऱ्यांची आहे. मात्र, दुर्दैवाने तसे घडताना दिसत नसल्याने अतिक्रमण निरीक्षक वैतागले आहेत.





