नगर | शहरात हुक्का पार्लरवर पोलिसाचा छापा

नगर, (प्रतिनिधी) – सावेडी उपनगरात सोनानगर चौकात विराम हॉटेल शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला. बुधवारी (दि.२८) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अंमलदार राजु जाधव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात हुक्का पार्लरच्या चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक सय्यद अनिस युसुफ (वय २० रा. कबाड गल्ली, पंचपीर चावडी, माळीवाडा) व मालक ऋषीकेश सतीष हिंगे (रा. बोरूडे मळा, पंचशीलनगर, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सय्यद याला ताब्यात घेतले असून हिंगे पसार झाला आहे. सोनानगर चौकातील विराम हॉटेलशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक भारती यांना मिळाली होती. त्यांनी सदर ठिकाणी खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या.
पथकाने बुधवारी सायंकाळी हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. काचेचे पॉट, हुक्का पाइप, चिलीम, तंबाखुजन्य पदार्थ असा सुमारे १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार एस.टी. नेटके अधिक तपास करीत आहेत.





