Pimpri : पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केले हुक्का पार्लर ; पोलिसांची कारवाई

पिंपरी : वाल्हेकरवाडी रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी (दि. ३१) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
इम्तियाज चांदभाई सय्यद (वय ३६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनोद कदम यांनी सोमवारी (दि. ३१) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत-वाल्हेकरवाडी रोडवर द हॉट कॉफी दुकानाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती रावेत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा मारून कारवाई केली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर असा आठ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी इम्तियाज सय्यद हा हुक्का फ्लेवर उपलब्ध करून तो ग्राहकांना पुरवत होता. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





