Police Protection: पुण्यातील २० जणांची पोलीस सुरक्षा काढली
Police Protection:

राणा सूर्यवंशी यांची सुरक्षा जैसे थे; विद्यानंद बापट यांचीही सुरक्षा काढली
Police Protection: शहरातील विविध भागांत वास्तव्य करणार्या महत्त्वाच्या व्यक्तींना पुणे पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती. दरम्यान, संबंधितांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर २० जणांना पोलीस सुरक्षा आवश्यक नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार डीजे वादनाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यासह २० महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढण्यात आली आहे. दरम्यान, उद्योजक राणा सूर्यवंशी यांची पोलीस सुरक्षा जैसे थे ठेवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी सुरक्षा पुरवलेल्या व्यक्तींसंदर्भात पोलीस संरक्षण समितीच्या बैठकीत सर्वंकष आढावा घेऊन २० जणांना पुरवलेली पोलीस सुरक्षा सध्यस्थितीत आवश्यक नसल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, १८ ऑक्टोबरपासून चर्चेत असलेल्या उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्या सुरक्षितेत कोणताही बदल न करता वाय प्लस एस्कॉर्ट दर्जाचे संरक्षण पुरवले आहे. दरम्यान, सुरक्षा काढलेल्यांमध्ये पुण्यातील काही बांधकाम व्यावसायिकांसह उद्योगपती, राजकीय विश्लेषक, फिल्म निर्मात्यांचाही समावेश आहे.
अधिकार पोलीस आयुक्तांना Police Protection:
शहरातील महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांना असतो. त्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याकडून संबंधितांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार कोणाला सुरक्षा द्यायची, कोणाची सुरक्षा काढायची, याचा निर्णय दर दोन महिन्यांनी होणार्या बैठकीत घेतला जातो. त्यानुसार २३ ऑक्टोबरला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये पुण्यातील २० जणांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
बापट यांचे संरक्षण हटवले Police Protection:
ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विद्यानंद बापट यांच्यावर गणशोत्सवापूर्वी खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना एकाने हल्ला केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना २४ तास पोलीस सुरक्षा दिली होती. दरम्यान, त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात पोलीस आढावा बैठकीत मागोवा घेतल्यानंतर त्यांना आता पोलीस सुरक्षिततेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले.




