Satara : एसटी बसस्थानक परिसरात वाढली पोलीस गस्त

सातारा : सातारा मध्यवर्ती एसटी बस स्थानकामध्ये होणाऱ्या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी पाऊल उचलले आहे. गर्दीचे फलाट तसेच विनावाहक विनाथांबा सेवा थांब्याजवळ साध्या वेषातील तसेच वर्दीतील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रिमझिम पावसात शनिवारी पोलीस कर्मचारी गर्दीचे नियमन करताना दिसल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला.
दिवाळीच्या हंगामामध्ये सलग दोन दिवसांत गर्दीचा फायदा घेऊन दोन महिलांच्या पिशवीतून दोन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले होते. या घटनांची दखल घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी शहर पोलिसांची कुमक स्थानक परिसरात वाढवली आहे .एसटी स्थानक परिसराचा प्रवेशद्वार, विनाथांबा सेवा तसेच कोल्हापूर आणि मुंबई या दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या फलाटांवर विरुद्ध दिशेला दोन पोलीस असे बंदोबस्त पॉईंट देण्यात आले आहेत. संशयितांवर लक्ष ठेवणे, गर्दीच्या वेळी बारकाईने पाहणी करून चोरट्यांचा बंदोबस्त करणे इत्यादी जबाबदाऱ्या पोलिसांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पोलीस नियंत्रण कक्षालासुद्धा चार पोलिसांबरोबर आणखी दोन पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे.
एसटी स्थानक परिसरात होणारी वादावादी, तसेच रिक्षा भाड्यावरून होणारे वाद इतर अप्रिय घटना टाळण्यासाठी बंदोबस्ताची कुमक वाढवण्यात आली आहे. याशिवाय एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर 360 डिग्रीमध्ये फिरु शकणारे शक्तिशाली कॅमेरे प्रस्तावित करण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांमध्ये सुमारे पाऊण किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा आणि वाहनांची छायाचित्रे सुस्पष्ट येतील अशी रचना करण्यात येईल असे संकेत आगार व्यवस्थापकांनी दिले आहेत.
सातारा शहर परिसरातील गुन्हे शंभर टक्के उघडकीस आणणे व मुद्देमाल हस्तगत करणे यादृष्टीने पेट्रोलिंग आणि बंदोबस्त पॉईंट वाढवले आहेत. त्यामुळे सातारा शहर परिसरात कोणती अप्रिय घटना न घडता कायदा व सुव्यवस्था सांभाळली जाईल. यादृष्टीने सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला पेट्रोलिंग आणि रात्रगस्त अशा दोन्ही सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.





