पोलीस पाटील हे पोलिसांचे नाक-डोळे : संदीपसिंग गिल

रांजणगाव गणपती – पोलीस पाटील हे पोलिसांचे नाक आणि डोळे असून, गावातील अनुचित घटना, संशयित आणि अनोळखी व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना देणे आवश्यक आहे. तसेच, ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील, पोलीस आणि ग्रामस्थांनी नोकरी-व्यवसायानिमित्त येणाऱ्या भाडेकरूंवर कडक नजर ठेवावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी केले. खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत आढळलेल्या जळालेल्या मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील पोलीस पाटलांच्या बैठकीत गिल बोलत होते. यावेळी पोलीस पाटलांनी तालुक्यातील काही समस्या मांडल्या. यामध्ये मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण, बिबट्याचा वाढता उपद्रव, बेट भागातील अवैध धर्मांतर, गुर्हाळांमुळे परप्रांतीयांचा वाढता भरणा, चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील अपघात आणि पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी यांचा समावेश आहे. या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील, असे गिल यांनी आश्वासन दिले.
पोलिसांचे निर्देश:
गिल यांनी सांगितले की, शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस तत्पर राहतील. पोलीस पाटलांनी महिन्यातून एकदा गावातील माहिती अधिकाऱ्यांना द्यावी आणि अंमलदाराने आठवड्यातून एकदा गावाला भेट द्यावी. रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा सहभाग आवश्यक आहे. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, तरुणांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे, ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी आणि सर्व ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
केंदूर आणि जातेगावचे कौतुक:
केंदूर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याशिवाय घराची नोंद न करण्याचा निर्णय घेतला, तर जातेगाव बुद्रुक येथे मुलींना लाठी-काठी प्रशिक्षण दिले जात आहे. या दोन्ही उपक्रमांचे गिल यांनी कौतुक केले.
मृतदेह प्रकरणात विशेष पथकाची नियुक्ती –
खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात येणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील गावांची लोकसंख्या पाच ते सहा पटींनी वाढली असून, भाडेकरूंविषयी अद्ययावत माहिती नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणून भाडे कराराचे अॅप तयार केले जाणार असून, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची माहिती देणे आणि भाडेकरूंची कागदपत्रे पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामपंचायतीला सादर करणे घरमालकांना बंधनकारक केले जाईल, असे गिल यांनी सांगितले.





