मुंबईजवळ द्वि-वार्षिक सराव ‘प्रस्थान’ चे आयोजन..

मुंबई – भारतीय नौदल आणि अन्य संरक्षण दलांचा सहभाग असलेला ‘प्रस्थान’ हा द्विवार्षिक सराव शुक्रवारी मुंबईजवळील समुद्रातील पश्चिम विकास क्षेत्रात आयोजित करण्यात आला. खनिज तेल उत्पादन तळावर उद्भवू शकणार्या विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी हा सराव दर सहा महिन्यांनी आयोजित केला जातो. या वर्षीचा सराव मुंबई बंदराच्या पश्चिमेस सुमारे 45 सागरी मैल अंतरावरच्या ओएनजीसीच्या रत्ना या तळावर आयोजित करण्यात आला होता.
सरावाच्या पहिल्या टप्प्यात दहशतवादी घुसखोरी, बॉम्बचा धोका, एखादा कर्मचारी तेल उत्पादन तळावरुन समुद्रात पडणे, तळावरील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय स्थलांतर आणि परिसरात तेल गळती यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठीच्या कृतींचा देखील सराव केला. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात, तेल उत्पादन तळावर आग लागणे आणि ऑफशोअर डेव्हलपमेंट क्षेत्रात बंद पडलेल्या जहाजाला मदत करणे यासारख्या आपत्कालीन परिस्थितींविरुद्ध कारवाईचा सराव करण्यात आला.
या सरावासाठी भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, ओएनजीसी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि नौवहन महासंचालक यांची अनेक जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती.
महाराष्ट्र पोलीस, सीमाशुल्क, मत्स्य विभाग, मुंबई बंदर प्राधिकरण, जेएन बंदर प्राधिकरण, भारत हवामान विभाग आणि इतर संबंधित राज्य आणि केंद्रीय नागरी संस्थांचे कर्मचारीही या सरावात सहभागी झाले होते.





