खाकी वर्दीवर ‘खईके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स करणाऱ्या ‘त्या’ 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात ‘खईके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स करणे चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगलट आले आहे. या 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून निलंबन करण्यात आले आहे. हे चारही कर्मचारी तहसील पोलीस ठाण्यातील आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलीस हवालदार अब्दुल गणी, पोलीस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
15 ऑगस्ट रोजी तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर देशभक्ती गीते स्पीकरवर वाजविण्यात आली होती. मात्र त्यानंतर ‘खईके पान बनारस वाला’ हे गाणं स्पीकरवर वाजवण्यात आलं. यावेळी एक सहाय्यक उपनिरीक्षक, एक पुरुष कर्मचारी तसंच दोन महिला कर्मचारी यांनी या गाण्यावर डान्स केला. यानंतर या डान्सचा व्हिडिओ मोठया प्रमाणात व्हायरल झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
का करण्यात आले निलंबन?
पोलीस महासंचालक कार्यालतून गणवेशात नाचण्यावर निर्बंध टाकण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी या नियमाचं उल्लंघन केल्याची दखल वरिष्ठांनी घेतली. त्यानंतर चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.





