Latur Police : लातूरमध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर पोलिसांची धडक कारवाई !
Latur Police : या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७८७ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Latur Police – लातूर जिल्हा पोलिसांनी मंगळवारपासून जिल्हाभरात हेल्मेट सक्ती मोहिमेची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७८७ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, या वर्षाच्या मार्च महिन्यापासून विविध माध्यमांतून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरण्याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत होती. (Latur Police)
वारंवार आवाहन करूनही अपेक्षेप्रमाणे हेल्मेटच्या वापराचे प्रमाण वाढले नाही. त्यामुळे १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ दंड वसूल करणे हा नसून रस्ते अपघातातील गंभीर दुखापती आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण रोखणे हा आहे.
अपघाताच्या वेळी डोक्याला लागणारी दुखापत अनेकदा प्राणघातक ठरते. त्यामुळे दुचाकीस्वारांचा जीव वाचवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जोपर्यंत लातूर जिल्ह्यात १०० टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत नाहीत, तोपर्यंत ही कारवाई अशीच सुरू राहील.





