दौंड – पुणे- लखनऊ एक्स्प्रेसमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी मारहाण करून पैशाची मागणी केल्याप्रकरणी प्रवाशांनी दौंड रेल्वे स्थानकाच्या तक्रार पुस्तकात तक्रार नोंदविली आहे.
पुणे लखनऊ एक्स्प्रेस ही पुणे स्थानकावरून दि. 23 रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वेस्थानकावरून निघाली होती. या गाडीमध्ये पुणे ते अहमदनगर, बेलापूरपर्यंत पेट्रोलिंगसाठी पुणे कुर्डुवाडी आणि सोलापूरचे पेट्रोलिंग तक्त्यानुसार राठोड, गाडे, कार्लेकर आणि पवार हे ड्युटीवर होते. पुणे-लखनऊ गाडीने प्रवास करणारे प्रवासी नवाज शरीफ व जुमाई साच हे आरक्षित डब्याने प्रवास करीत होते. त्यांच्याजवळ वेटिंगचे तिकीट होते. मात्र, प्रवासादरम्यान हे तिकीट कन्फर्म झाले होते. त्यानुसार ते प्रवास करीत होते.
पुणे ते दौंड प्रवासादरम्यान त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी तिकीट मागितले. त्यानंतर हे तिकीट कन्फर्म नसताना तुम्ही आरक्षित डब्यातून प्रवास कसा करत आहात, असा सवाल केला. त्यानंतर त्या प्रवाशांनी तिकीट तपासणीसकडून आमचे तिकीट कन्फर्म झाले असल्याची माहिती त्यांना दिली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रेल्वेतीलच गार्ड डब्याकडे घेऊन जाऊन तुमच्याकडे अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगून मारहाण केली. तुमच्यावर गुन्हे दाखल करतो, अशी दमबाजी करीत त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले. त्यानंतर ही एक्स्प्रेस दौंड स्थानकावर आल्यानंतर त्यांनी तिकीट तपासणीसाची मदत घेत थेट स्टेशन प्रबंधक यांचे कार्यालय गाठले. हा प्रकार स्टेशन प्रबंधक यांना सांगितला. स्टेशन प्रबंधक यांनी हा प्रकार दौंड लोहमार्ग पोलिसांना कळविला. याबाबतची लेखी तक्रार त्यांनी तक्रार पुस्तकात नोंद करून घेतली आहे. ही तक्रार दौंड स्टेशन प्रबंधक यांनी दौंड लोहमार्ग पोलीस यांना पाठवली आहे.
दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, चौकशीनंतर गुन्हा दाखल करायचा का नाही, ते ठरविले जाईल. प्रवाशांनी तक्रार पुस्तकात तक्रार दिली असून ती तक्रार स्टेशन प्रबंधकांकडून आमच्याकडे प्राप्त झाली आहे. यात चौकशीनंतर निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.