Nagar | शेवगाव बस स्थानकावर पोलीस मदत केंद्र

शेवगाव, (प्रतिनिधी) – शेवगाव बसस्थानकात पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन पोलीस निरीक्षक समाधान नागरे व बसस्थानक प्रमुख अमोल कोतकर यांच्याहस्ते करण्यात आले .
शेवगाव हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने येथील बसस्थानकावर रात्रंदिवस एसटी गाड्याची ये-जा असते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. अबाल वृद्ध, महिला, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनीच्या गर्दीने हे बसस्थानक गजबजलेले असते. या गर्दीचा फायदा अनेक अवैध धंदेवाईक घेत असतात.
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे, पाकीट मारणे, बॅग व वाहन चोरीच्या घटना तसेच रात्री- अपरात्री अबाल वृद्ध, महिला यांच्या छेडछाडीचे प्रकार सातत्याने घडत असतात. त्यामुळे नव्याने बांधकाम झालेल्या या बसस्थानकात पोलीस मदत कक्ष असावे, अशी प्रवाशांची
मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती.
बसस्थानकाचे अधिकारी देखील अनेक दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर याचा पाठपुरावा करत होते. त्यावर सामाजिक कार्यकर्ते डॉ.नीरज लांडे व भाग्यलक्ष्मी जाळी उद्योग समूहाचे संचालक नीलेश बोरुडे यांनी बसस्थानकात मदत कक्ष तयार करून दिल्याने लगेच सोय झाली.
यातून बसस्थानकावर होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत होणार आहे. उद्घाटनप्रसंगी या ठिकाणी २४ तास पोलीस सेवा उपलब्ध करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक नागरे, अमोल कोतकर, किरण शिंदे, लटपटे, जगदीश धूत, बंडू रासने,डॉ. कृष्णा देहाडराय, दत्तात्रय फुंदे, सुभाष लांडे, शरद जोशी, किरण काथवटे, अमोल माने, ऋषिकेश सोनवणे, राजेंद्र वडते, सुभाष गवळी, प्रकाश खेडकर व प्रवासी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिजीत आव्हाड यांनी केले.





