अपघातानंतर फरार झालेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पोलिसी खाक्या धाकवताच गुन्ह्याची कबुली, शिरुर पोलिसांची कारवाई

शिरूर: शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे भरधाव टेम्पोच्या झालेल्या दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र, शिरूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
ही घटना ११ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास शिरसगाव काटा येथील तळ्याजवळ घडली होती. घटनेनंतर अज्ञात टेम्पोने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात करणसिंग ग्यारसिंग जमरे (वय ४९, रा. बडवाणी, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला, तर टिकम जमरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली. पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अंमलदार नितेश थोरात आणि रविंद्र आव्हाड यांनी शिरसगाव काटा, पिंपळसुटी, निर्वी, तांदळी आणि काष्टी या परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित वाहन अशोक लेलंड टेम्पो (क्रमांक: KM-25AJ-7637) असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसी खाक्या धाकवताच…
तपासाअंती संबंधित टेम्पो वारे वडगाव (ता. भूम, जि. धाराशिव) येथे असल्याचे समजले. सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप आणि अंमलदार रविंद्र आव्हाड यांच्या पथकाने वारे वडगाव येथे जाऊन वाहन जप्त केले. चालक प्रितेश राजेंद्र गायकवाड (रा. चारे वडगाव, ता. भूम, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने अपघात केल्याची कबुली दिली.
कौतुकास्पद कारवाई
या तपासाची आणि अटकेची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांच्या पथकाने केली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेऊन आरोपीला अटक करण्याची शिरूर पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद ठरत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करीत आहेत.





