पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला तसेच एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो (ACB) पुणे यांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज (दि. 13 ऑक्टोबर) कोंढवा पोलीस स्टेशन समोर करण्यात आली. तक्रारदाराविरुद्ध दाखल वीज चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच अटक न करण्याच्या मोबदल्यात 10,000 रुपयांची लाच मागणी करण्यात आली होती. अखेर तडजोडीअंती 5,000 रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहात पकडला गेला. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस शिपाई सोमनाथ बापू महारनवर ( 34), कोंढवा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून, त्याला मदतीसाठी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक युवराज कृष्णा फरांदे ( 59) यांनी प्रोत्साहन दिले होते. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 10 व 11 ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून लाच स्वीकारतानाच आरोपीला पकडले. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस निरीक्षक असावरी शेडगे यांच्या पथकाने केली. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी खालील माध्यमांचा वापर करावा: 020-26122134 / 26132802 / 9403781064 WhatsApp: 9403781064 www.acbmaharashtra.gov.in