पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; हातभट्टीचा हजारो लिटर कच्चा माल नष्ट; आरोपी महिला फरार!

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – तळेगाव एमआयडीसी आणि शिरगाव परिसरात पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी ठेवलेला कच्चा माल जप्त करून नष्ट केला आहे. दोन्ही ठिकाणी महिला आरोपी पोलिसांची चाहूल लागताच फरार झाल्या.तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. १२ जानेवारी) रोजी दुपारी ३.४५ वाजता ओढ्याच्या कडेला पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे एक हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, अंदाजे ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. छाप्यावेळी महिला आरोपी घटनास्थळी दिसून आली; मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच ती झाडाझुडपात पळून गेली.
या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारमधील पोलीस अंमलदार प्रशांत दिलीप सोनवणे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दरम्यान, शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. १२ जानेवारी) रोजी सायंकाळी ७.३० वाजता शिरगाव येथे पवना नदीकाठच्या मोकळ्या जागेत आणखी एक छापा टाकण्यात आला.
या ठिकाणी हातभट्टी दारूसाठी वापरले जाणारे पाच हजार लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन, अंदाजे एक लाख ७५ हजार रुपये किमतीचा साठा मिळून आला. येथेही महिला आरोपी फरार झाली. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद राजेन्ना जंगिलवाड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.





