अमरावती: अवधुतवाडी येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. रणधीर यांच्यावर त्यांच्याच अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. राज्यात सरकारी अधिकारी यांनी लाच स्वीकारण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. काय आहे प्रकरण? तक्रारदार यांच्या मित्राला 10 लाख रुपयांची आवश्यकता होती. तक्रारदार यांनी दुसऱ्याकडून घेऊन 10 लाख रुपये मित्राला उसणवारीवर दिले. मात्र मुदतीनंतरही मित्र पैसे देत नसल्याने तक्रारदार यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी पैसे वसूल करण्यासाठी रणधीर यांनी पाच लाख त्यानंतर 3 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला आणि ही रक्कम स्वीकारताना अमरावती लाचलुचपत विभागाने रणधीर यांना रंगेहात अटक केली. अवधुतवाडी ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.