ओतूर : वडगाव कांदळी (ता.जुन्नर) राखीव वन कक्ष क्रं 44 मध्ये अवैधरित्या पोकलँड मशीनच्या सहाय्याने विहीर खोदण्यार्यास बेड्या ठोकून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. राजाराम ज्ञानदेव फापाळे (रा.बेलापुर ता. अकोले जि. अहमदनगर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. वनक्षेत्र हद्दीत विहीर खोदण्याचे काम सुरू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली नुसार ओतूर वनपरिक्षेत्र स्टाफने घटनास्थळी जावुन हे अवैध काम थांबवण्याची कारवाई करण्यास गेले असता तेथे मोठे संख्या जमावाने त्यास प्रतिबंध करून अटकाव केल्याने कारवाई करता आली नव्हती. त्याअनुषंगाने त्यानंतर वनविभाग पोकलँड मशीनचा मालक/आरोपीच्या शोधात होते. दरम्यान, राजारामने इतर आरोपींसोबत संगनमताने पोकलँड मशीनसह वडगाव कांदळी येथील शासकीय राखीव वनात जावून वनाच्या हद्दी खुणा नष्ट करून तेथील झाडेझुडपे साफसफाई करून विहीर खोदल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येवुन त्यास सोमवारी (दि. 16) अटक करण्यात आली. या आरोपीस मंगळवारी (दि. 17) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयात हजर केले असता शासनाच्या वतीने सहा. सरकारी वकील अवचर व वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांनी युक्तीवाद केला. यायालयाने गुन्ह्यात वापरण्यात आलेले पोकलँड मशीन तसेच सहभागी इतर आरोपींचा शोध घेवून तपास करण्यासाठी आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी निकीता बोटकर यांनी वनपरिक्षेत्र ओतूर स्टाफ समवेत केली असून पुढील तपास लहु ठोकळ करीत आहेत.