Pod Taxi in Mumbai : ना गर्दी, ना धक्काबुक्की.! मुंबईत धावणार ‘पॉड टॅक्सी’ नेमकी आहे तरी कशी? A टू Z माहिती एका क्लिकवर….
ही वाहनं वीजेवर चालणार असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रवासी एका स्थानकावरून थेट इच्छित स्थानकावर जाऊ शकतील.

Pod Taxi in Mumbai : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून कुर्ला ते वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) दरम्यान देशातील पहिला ‘पॉड टॅक्सी‘ प्रकल्प साकारला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत राबवण्यात येणारा हा प्रकल्प भारतातील सार्वजनिक वाहतुकीत मोठा तांत्रिक बदल घडवणारा ठरणार आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल हे देशातील प्रमुख आर्थिक आणि कॉर्पोरेट केंद्र मानले जाते. दररोज लाखो कर्मचारी या भागात ये-जा करतात. रेल्वे स्थानकांपासून कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना रिक्षा, टॅक्सी किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.
यामुळे वाहतूक कोंडी आणि वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ मजबूत करण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
पॉड टॅक्सी म्हणजे नेमकं काय?
पॉड टॅक्सी म्हणजे “Personal Rapid Transit (PRT)” ही एक छोटी, स्वयंचलित आणि इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. यामध्ये प्रवाशांना एका “pod” नावाच्या छोट्या कॅप्सूलमध्ये एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकापर्यंत थेट आणि वेगवान प्रवास करता येतो. ही लहान कॅप्सूलसारखी वाहनं पूर्णपणे ड्रायव्हरलेस असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर चालतात. पॉड टॅक्सी जमिनीपासून 5 ते 10 मीटर उंचीवरून धावते.
प्रत्येक पॉडमध्ये सुमारे सहा प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था असेल. ही वाहनं वीजेवर चालणार असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रवासी एका स्थानकावरून थेट इच्छित स्थानकावर जाऊ शकतील, त्यामुळे मधल्या थांब्यांवरील गर्दी टाळता येणार आहे.
प्रकल्पाची सुरुवात कशी असणार :
या प्रकल्पाची एकूण लांबी 8. 85 किलोमीटर इतकी असून मार्गावर एकूण 22 स्थानकं उभारली जाणार आहेत. प्रत्येक 200 मीटर अंतरावर वातानुकूलित स्थानकांची सुविधा असेल. पॉड टॅक्सी ताशी सुमारे 40 किलोमीटर वेगाने धावणार आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे 1,016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात 3.3 किलोमीटर मार्ग विकसित केला जाणार असून कुर्ला, एलबीएस मार्ग, बीडीबी गेट 11, MMRDA पे-अँड-पार्क, वांद्रे टर्मिनस, कलानगर, ऑडिट भवन आणि MMRDA कार्यालय या आठ स्थानकांचा समावेश असेल.
या सेवेला मुंबईतील सिंगल मोबिलिटी कार्ड प्रणालीशी जोडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात प्रवाशांना मेट्रो, बस, लोकल रेल्वे आणि पॉड टॅक्सी अशा सर्व सेवांचा वापर एका कार्डद्वारे करता येणार आहे.
तसेच बांधकामामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून व्यावसायिक भागात प्रामुख्याने रात्रीच्या वेळेत काम करण्यात येणार आहे. मार्गिका रस्त्यांच्या दुभाजकावर उभारली जाणार असल्याने पदपथांवर कमी परिणाम होईल.
जगातील पहिली पॉड टॅक्सी :
पॉड टॅक्सी प्रणाली जगात प्रथम आधुनिक स्वरूपात संयुक्त अरब अमिरातीतील Abu Dhabi (अबु धाबी) येथील ‘मसदर’ सिटीमध्ये सुरू करण्यात आली होती.
त्यानंतर Dubai आणि लंडनमधील Heathrow Airport (हिथ्रो विमानतळ) येथेही ही सेवा यशस्वीरित्या कार्यरत आहे. वेगवान, सुरक्षित आणि अखंड प्रवास ही या व्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.
मुंबईतील पॉड टॅक्सीचा पहिला टप्पा 2027 च्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास भविष्यात मुंबईतील इतर महत्त्वाच्या भागांमध्येही अशा प्रकारची स्मार्ट वाहतूक व्यवस्था सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.








