पुणे | पब आणि रुफ टॉपवर पीएमआरडीएचा हातोडा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत हॉटेल, पब आणि रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार हिंज़वडी परिसरातील 10 पब, हॉटेलवर कारवाई करून अनधिकृत बांधकाम पाडले. आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही अनधिकृत हॉटेल, पबवर पीएमआरडीएने हातोडा टाकला आहे.
कल्याणीनगर येथील हिट अॅन्ड रन प्रकरणात दोन ज़णांचा जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर पालिका हद्दीत पालिकेकडून अनधिकृत हॉटेल व पबवर कारवाई करण्यात आली. मात्र, निवडणुकीच्या कामकाजामुळे पीएमआरडीए हद्दीत आतापर्यंत कारवाई झाली नव्हती. अखेर गुरुवारी पीएमआरडीएने अनधिकृत हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
हिंजवडी,( ता. मुळशी) येथील गट नंबर २१, २८, २९ मधील आठ अनधिकृत बार अँड रेस्टो व दोन रुफ टॉप बार अँड रेस्टो वर पीएमआरडीएने गुरुवारी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 97 हजार 815 चौ.फुट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. या कारवाईवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



