PMRDA: सर्व विभागांची धुरा अनुभवी अधिकाऱ्यांकडे
PMRDA:

पीएमआरडीएतील रिक्त जागांवर अंतर्गत नियुक्त्या
PMRDA: राज्य शासनाकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) दहा अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने रिक्त झालेल्या जागी तातडीने सक्षम अधिकाऱ्यांकडे तात्पुरती नियुक्ती आणि अतिरिक्त पदभार सोपवला आहे.
सध्या प्राधिकरणांतर्गत मेट्रो मार्गिका-३, रिंग रोड आणि विविध नगररचना (टीपी) योजनांची कामे अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून, ही सर्व लोकहिताची कामे विनाअडथळा आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व विभागांची धुरा नव्या अधिकाऱ्यांकडे सोपवली, अशी माहिती प्रशासनाने दिली.
पीएमआरडीएच्या अभियांत्रिकी विभागातून कार्यकारी अभियंता विद्याधर शिंदे यांच्या बदलीनंतर त्यांच्या पदाचा कार्यभार कार्यकारी अभियंता अभिमान भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला असून, उपअभियंता रश्मी पाटील यांच्या जागी शंकर कोळेकर यांची नियुक्ती केली आहे.
अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी (अभियांत्रिकी विभाग-२) आणि अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी (अभियांत्रिकी विभाग-१) यांच्याकडे विभागून देण्यात आली आहे.
नगररचना विभागातील फेरबदलांमध्ये सहाय्यक नगररचनाकार शुभम वाकचौरे यांच्या जागी ऐश्वर्या डोखळे, तर सागर मोगरे यांच्या जागी रचना सहाय्यक आशीष सहाणे काम पाहणार आहेत. याशिवाय, मनोज राठोड यांच्या जागी संगमेश्वर पन्नासे, रामेश्वर मवार यांच्या जागी शुभम वाकचौरे आणि हनिफ मुलाणी यांच्या जागी सहाय्यक नगररचनाकार आशीष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था आणि आर्थिक ताळेबंद चोख ठेवण्यासाठी पोलीस व लेखा विभागातही तितक्याच वेगाने निर्णय घेतले आहेत. पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांच्या जागी पवन पाटील यांच्याकडे तातडीने पोलीस विभागाची धुरा सोपवली असून, लेखाधिकारी माधुरी बांदल यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी मनोज हिंगे हे नवे लेखाधिकारी म्हणून आर्थिक कामकाजाचा पदभार सांभाळतील.
पीएमआरडीएकडून अत्यंत वेगाने आणि सुनियोजित पद्धतीने करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमुळे प्रशासकीय सुसूत्रता अधिक बळकट होणार असून, सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेतच पूर्ण होतील, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.




